अमरधाम प्रकरण । पालिकेच्या दोघा अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा


संगमनेर,

भारतीय जनता पक्षाने केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपानंतर बहुचर्चित ठरलेल्या संगमनेरच्या अमरधाम सुशोभीकरणाच्या कामात निविदा काढून फसवणूक केल्याप्रकरणी नगरपरिषदेतील दोघा अभियंत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सुतावणे आणि सूर्यकांत गवळी अशी दोघा अभियंत्यांची नावे आहेत.


संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या दोघा अभियंत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगरपरिषद हद्दीतील अमरधाम सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या टप्पा दोन आणि तीन मधील कामे निविदा काढण्यापूर्वीच केलेली असताना सादर करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता निविदा काढून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


दरम्यान येत्या काही दिवसात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने भारतीय जनता पक्षाने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता. या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी न्यायालयात देखील जाणार असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते. अखेरीस या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने आता पुढे काय घडते याकडे  संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.


काय आहे नेमके प्रकरण

संगमनेर नगर परिषदेच्या माध्यमातून अमरधाम सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचे काम 2019 मध्ये झालेले असताना त्याच कामासाठी पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात 33 लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात निविदेप्रमाणे काम झालेले असल्याने याच कामासाठी पुन्हा निविदा काढणे म्हणजे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी आंदोलने घडवून आणली होती. तसेच या प्रकरणी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह तत्कालीन  मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांवर देखील आर्थिक गैरव्यवहारचे आरोप करण्यात आले होते. तसेच या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.


तक्रारीनंतर काय घडले

ॲड. श्रीराम गणपुले यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना या संदर्भात सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. शिंदे यांच्या चौकशीमध्ये नगर अभियंता राजेंद्र सुखावणे आणि कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी दोषी असल्याचे आढळून आले होते. मुख्याधिकारी शिंदे यांनी यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात या दोघा अभियंत्याविरोधात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पण्या