एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज
कोरोनाने पती मृत्यू झालेल्या एकल महिलांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांचा संवाद
संगमनेर | अनंत पांगारकर
कोरोनाने पतीच्या मृत्युने एकल झालेल्या महिलांचे पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले.
संगमनेर येथील शासकीय वसतिगृहात कोरोनाने मृत्यू झालेल्या एकल महिलांशी उपसभापती गोऱ्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कोरोना एकल समितीचे हेरंब कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे उपस्थित होते.
या बैठकीला संगमनेर, अकोले, कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर या परिसरातील एकल महिलांसह प्रतिमा कुलकर्णी, कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता मालकर, शिवसेना महिला आघाडीच्या संगमनेर - अकोले तालुका संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, बारामती लोकसभा सहसंपर्क प्रमुख स्वाती ढमाले, युवती सेना सचिव शर्मिला येवले, कोथरूड विधानसभा युवती अधिकारी वैभवी सुर्यवंशी उपस्थित होत्या.
गोऱ्हे म्हणाल्या, ज्यांचे पती शेतकरी होते. पण कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा महिलांना कृषी विभागाने शेतीसाठी खते व बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत. महिलांच्या नावावर मालमत्ता व शेती लवकरात लवकर हस्तांतरित व्हायला हवी यासाठी महसूल प्रशासनाने अशा महिलांना न्यायिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. एकल महिलांनी फक्त उद्योगासाठी कर्ज मिळविणे या एकच उद्देश न ठेवता घेतलेल्या शिक्षणानुसार नोकरी प्राप्त करण्यावरही भर द्यावा. जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ व कौशल्य विकास विभागाच्या योजनांच्या माध्यमातून या महिलांना लाभ देणे शक्य आहे.
एकल महिलांपैकी काही महिलांना अद्याप ५० हजारांचा लाभ मिळालेला नाही, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळाला नाही, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला नाही, वैयक्तीक कागदपत्रे काढतांना अनेक अडचणी येतात. यांसारख्या समस्या एकल महिलांनी यावेळी मांडल्या. त्यावर उपसभापती गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा