जिल्हा परिषदेसाठी नव्याने आणखी एका गटाची भर सर्वाधिक १० गट संगमनेरात
जिल्हा परिषदेसाठी नव्याने आणखी एका गटाची भर
सर्वाधिक १० गट संगमनेरात
अनंत पांगारकर
संगमनेर : नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. यात संगमनेरमध्ये आणखी एका गटाची भर पडली आहे. गटांच्या तोडफोडीत गावे विभागली गेल्याने इच्छुकांची चांगलीच संभ्रमावस्था वाढली आहे. नव्याने तयार होणारी यादी समाजमाध्यमावर फिरत असुन या यादीनुसार आता पुन्हा इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. आता संगमनेरमध्ये जिल्हा परिषदेचे १० गट असतील. जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांची एकाच तालुक्यातील ही सर्वाधिक संख्या असेल.
२०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन या गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये यापु्र्वी जिल्हा परिषदेचे ९ गट होते. यात समनापुर, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, बोटा व साकुर या गटांचा समावेश होता. यातील आश्वी बुद्रुक गट वगळता उर्वरीत सर्व गटांवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व होते. तर आश्वी या गटातुन आमदार राधाकृष्ण विखे यांच्या समर्थक निवडून आल्या होत्या. जिल्हा परिषदेत सर्वाधीक जागा असलेल्या थोरात गटाने समित्यांवर आपले वर्चस्व राखले. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषदेतील गट वाढणार असल्याचे संकेत शासन स्तरावरुन निघाल्यानंतर संगमनेरमध्ये कोणता गट वाढतो याकडे लक्ष लागले होते. नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या गटात जिल्हा परिषदेच्या पठार भागातील गटामध्ये मोठी तोडफोड झाली. तर अनेक गावे गटांमध्ये नव्याने समाविष्ठ करण्यात आल्याने आता गटांची नावे देखील बदलली आहेत.
समनापुर, आश्वी, जोर्वे, घुलेवाडी, संगमनेर खुर्द, बोटा व साकुर या गटामध्ये गावांची संख्या कमी अधिक करण्यात आली तर पुर्वीचे वडगांव पान, धांदरफळ बुद्रुक या दोन गटांऐवजी सावरगाव तळ व तळेगांव या दोन गटांची भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व गटाची पुनर्रचना झाल्याने नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांमुळे पुन्हा एकदा इच्छुकांची गणिते बदलणार आहेत. तालुक्यातील १४३ ग्रामपंचायती व ४२२१३५ मतदार संख्या विचारात घेता ही तोडफोड करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मानणारे नऊपैकी आठ सदस्य गतवेळी निवडून गेले होते. तर आमदार विखे यांचे नेतृत्व मानणारी एक महिला निवडून आली होती.
यातील बहुसंख्य सदस्यांचे प्रगतीपुस्तक कोरेच राहीले आहे. अनेक सदस्यांची नांवेदेखील तालुक्यातील मतदारांना माहिती नाही, अशी स्थिती आहे. केवळ मंत्री थोरात यांचा करिष्मा म्हणुन या सदस्यांना जिल्हा परिषदेत संधी मिळाली मात्र अपवाद वगळता त्यांना जिल्हा परिषदेत आपली छाप पाडण्यात पुर्णत: अपयश आले. त्यामुळे यातील बहुतेक सदस्यांना मंत्री थोरात पुन्हा संधी देण्याची शक्यता मावळल्याने त्यांना घरी बसावे लागण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे नव्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
(चौकट)
संभाव्य गट आणि त्यात समाविष्ठ गावे पुढीलप्रमाणे
समनापुर : निमोण, कर्हे, सोनेवाडी, पळसखेडे, सोनोशी, पिंपळे, पारेगाव बुद्रुक, नान्नज दुमाला, काकडवाडी, पारेगांव खुर्द, समनापुर, कुरण, सुकेवाडी, खांजापुर व मालदाड
तळेगाव : तळेगाव, आरामपुर, जुनेगांव, हसनाबाद, अजमपुर, चिंचोली गुरव, देवकौठे, तिगाव, करुले, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, कासारे, लोहारे, मिरपुर, वडगांव पान, माळेगांव हवेली, निळवंडे, कौठे कमळेश्वर, मेंढवण, कोकणगाव, शिवापुर व पोखरी बाळेश्वर.
आश्वी बुद्रुक : आश्वी बुद्रुक, प्रतापपुर, चिंचपुर बुद्रुक, चिंचपुर खुर्द, सादतपुर, औरंगपूर, निमगांव जाळी, आश्वी खुर्द, शिबलापुर, उंबरी, बाळापुर, पिंप्री लौकी अजमपुर, खळी, झरेकाठी, चणेगांव व दाढ खुर्द.
जोर्वे : जोर्वे, कोल्हेवाडी, रहीमपुर, ओझर खुर्द, खराडी, अंभाेरे, मालुंजे, ओझर बुद्रुक, कनकापुर, कनोली, मनोली, शेडगांव, हंगेवाडी, कोंची, मांची व पानाेडी.
घुलेवाडी : घुलेवाडी, गुंजाळवाडी, ढोलेवाडी व वेल्हाळे
संगमनेर खुर्द : संगमनेर खुर्द, वैदुवाडी, रायतेवाडी, जाखुरी, झोळे, खांडगांव, कासारा दुमाला, निंबाळे, वाघापुर, रायते, देवगाव, कोळवाडे, पिंपरणे, निमज, निमगाव टेंभी, शिरापुर, चंदनापुरी, गाभणवाडी, खरशिंदे व कणसेवाडी.
साकुर : पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, रणखांबवाडी, मांडवे बुद्रुक, शिंदोडी, वरवंडी, कुंभारवाडी, चौधरवाडी, खांबे, साकूर, शेंडेवाडी, जांबूत बुद्रुक, जांबुत खुर्द, जांभुळवाडी, डिग्रस व बिरेवाडी.
बोटा : आंबी खालसा, कौठे खुर्द, खांडगेदरा, माळेगाव पठार, हिवरगाव पठार, कौठे बुद्रुक, खंदरमाळवाडी, बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबी दुमाला, म्हसवंडी, कुरकुटवाडी, अकलापुर, आभाळवाडी, शेळकेवाडी, येलखोपवाडी, कुरकुंडी, भोजदरी, पेमरेवाडी, वनकुटे, घारगांव व बोरबनवाडी.
सावरगांव तळ : सावरगांव घुले, सारोळे पठार, पिंपळगाव माथा, सांगवी, हिवरगांव पावसा, वरुडी पठार, पोखरी बाळेश्वर, नांदुर खंदरमाळ, सावरगाव तळ, महालवाडी, मिर्झापुर, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, डोळासणे, बांबळेवाडी, जवळेबाळेश्वर, कौठेवाडी, नांदुरी दुमाला, निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, पेमगिरी, सावरचोळ, मेंगाळवाडी, शिरसगांव व धुपे.
राजापुर : राजापुर, जवळेकडलग,, निमगाव भोजापुर, चिकणी, वडगांव लांडगा, पिंपळगांव कोंझिरा, कोकणेवाडी, धांदरफळ बुद्रुक, सायखिंडी, कौठे धांदरफळ, धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी, चिखली व मंगळापुर.
—------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा