राजकारणात न रमलेला मात्र समाजकारणात क्रांती घडविणारा माणूस


राजकारणात न रमलेला मात्र समाजकारणात क्रांती घडविणारा माणूस



अनंत पांगारकर 
पत्रकार दैनिक पुण्यनगरी 

सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात संगमनेर चा सामाजिक राजकीय पटलावरील एक सुवर्णपान. सहकारातील या दिग्गज नेत्यांची ओळख आदरार्थी दादा म्हणून सर्वपरिचित आहे. त्यांचा आज ९८ वा जन्म दिवस. ही थोर विभूती आज आपल्यात नसली तरी त्यांच्या स्मृती मात्र आपल्यासोबत चिरंतन आहेत. संगमनेरच्या समाजकारणात या माणसाने मोठी क्रांती घडविली. आजचा संगमनेरचा समृद्ध सहकार ही दादांचीच देण. या महात्म्याने दुष्काळी भागात आमूलाग्र क्रांती घडविली. सहकाराच्या माध्यमातून येथे उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला. येथील शेती बहरली. कुटुंबांसह तालुका समृद्ध झाला. संगमनेरची ओळख राज्यात विकसनशील शहरांमध्ये होऊ लागली. भविष्याचा वेध घेत दूरदृष्टीने समाजकारणाला समृद्धीच्या वाटेवर नेणारा हा महात्मा जर राजकारणात रमला असता तर आजच्या जिल्हा व राज्याच्या राजकारणाची दिशा निश्चितच आणखी वेगळी दिसली असती. 

वाचनातून माणूस समृद्ध होतो असे म्हणतात दादांच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले. विद्यार्थी दशेमध्ये नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथ वाचन. त्यानंतर नाशिक रोड जेलमध्ये अण्णासाहेबांच्या विचारांची मिळालेली जोड यातून त्यांची वाचन आणि लिखाणाची समृद्ध बैठक तयार झाली. वाचनाचा व्यासंग असलेले आणि अभ्यासू वृत्तीने प्रत्यक्ष लोकात कार्य करणारे पुढारी हल्ली दुर्मिळ झाले असताना वयाच्या शेवटपर्यंत वाचन संस्कृती जोपासणाऱ्या या महात्म्याने आपल्या शेवटच्या दिवसात "झाडं लावणारा माणूस" या छोट्याशा पुस्तकातून प्रेरणा घेत तालुक्याला दंडकारण्य अभियानाचा मूलमंत्र दिला. सुरुवातीचे हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे झाडांचे, वृक्षांचे महत्त्व यातून अधोरेखित झाले. 
सहकार, शेती, शिक्षण, पाणी, दुग्ध व्यवसाय, अर्थकारण व राजकारण यातील यशाचे शिखर गाठणाऱ्या दादांचे कार्य संगमनेरच्या इतिहासातील सुवर्णपान ठरणारे आहे. दादा सत्तेच्या राजकारणात फारसे रमले नसले तरी राजकारणातील त्यांनी आपले महत्त्व शेवटपर्यंत कायम ठेवले. राजकारण्यांसाठी आदर्शवत असे त्यांचे वर्तन राहिले. समाजकारण आणि राजकारणात काम करणाऱ्या दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही डाग आपल्या कर्तुत्वाला लागू दिला नाही ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात जमेची बाजू ठरली. सहकारात काम करताना त्यांनी दिलेली शिकवण ही आजच्या सहकारासाठी आदर्शवत अशी आहे. आपण कोणत्याही संस्थेमध्ये काम करताना विश्वस्तांच्या भावनेतून केले पाहिजे या भूमिकेतून त्यांनी आर्थिक शिस्त, काटकसर आणि पारदर्शकता याद्वारे सहकाराला नवी ओळख दिली. हल्ली राजकारणात गेलेले लोक सत्तेच्या मोहापायी कुठल्याही थराला जाताना दिसतात. येनकेनप्रकारे सत्ता टिकविणे, सत्तेत राहणे, यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारे नेते समाजकारणापासून दुरावले आहेत. अशा स्थितीत समाजकारणाची नाळ असलेल्या या महात्म्याने राजकारणातील संधींवर लाथ मारत आपल्या माणसांसाठी सहकाराची कास धरली. 
सहकाराच्या माध्यमातून देखील राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. राजकारणात अनेक संधी उपलब्ध असताना देखील दादांनी त्याकडे पाठ फिरवत सहकार हाच आपला ध्यास मानत शेवटपर्यंत काम केले. स्वातंत्र्य लढ्यात झोकून देऊन काम करणाऱ्या दादांनी स्वातंत्र्यानंतर समाजासाठी लढे उभारले. या काळात त्यांनी असंख्य सहकारी जोडले. शेवटपर्यंत त्यांना साथ देणाऱ्या या सहकाऱ्यांनी देखील नंतरच्या कालखंडात बाळासाहेब थोरात यांना साथ दिली. कम्युनिस्ट विचारसरणीचे दादा कालांतराने काँग्रेसच्या विचारसरणीकडे वळाले. 1952 ते 1962 या कालखंडात त्यांनी शेतकरी कामगारांची चळवळ विधायक दिशेने नेतांना त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. यासाठी त्यांच्या हाती सहकाराचे उत्तम माध्यम लागले होते. यातून जनमानसावर त्यांचा चांगलाच प्रभाव पडला. 
पूर्वी संगमनेरच्या भोवताली तालुक्यात असलेला ओसाड शिवारात काळ्याभोर जमिनी आणि वस्त्रहरण झाल्यासारखा टेकड्या दिसत. दळणवळणासाठी गाडीवाट, पायवाटे शिवाय रस्ते नसत अशा परिस्थितीत शिवार सुनासुना वाटत असताना तसेच सर्व काही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असताना या भागात सहकारातून समृध्दी निर्माण होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. आज या भागात ऊसमळे दिमाखाने डोलतात. द्राक्षांच्या बागा दिसतात, कांदा टोमॅटो आदीसारख्या भाजीपाल्याच्या ट्रकच्या ट्रक गावागावातून भरून मोठ्या शहराकडे जातात. शेतीबरोबरच आता नव्याने दुग्ध व्यवसायदेखील येथील शेतकरी कुटुंबाचा आर्थिक भाग बनला आहे. वैभवाचा मूलमंत्र देणाऱ्या साखर कारखान्यापाठोपाठ येथील मुलांना बाहेर शिक्षणासाठी जावे लागू नये त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने निर्माण केलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे महाविद्यालये, इंग्लिश मीडियम स्कूलमधून पदव्या घेतलेली आज हजारो विद्यार्थी देश-परदेशात कार्यरत आहेत. गावोगावी निर्माण झालेल्या सहकारी सोसायट्या, दूध सोसायट्या, पतसंस्था आज उत्तमरित्या सुरु आहे. शेतकी संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्था आज नावारूपास आल्या आहेत. दादांनी पाया घातलेल्या या संस्थांवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तम रीतीने कळस चढविला आहे. दादांचा वारसा अव्याहतपणे पुढे सुरू राहणार असल्याने त्यांच्या कर्तुत्वाला हीच आदरांजली ठरणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य