प्रशासकीय काळातही स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान वेगात, शहरातील भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचे संदेश

 

           नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीं प्रथमत: नगराध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आणि स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेरचा नारा देत त्यादृष्टीने आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळातच शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाची जोड त्याला मिळाली. दुग्धशर्करा योग जुळून आला आणि नगराध्यक्ष तांबे यांच्यासह तत्कालिन पालिका प्रशासनाने तत्कालिन मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली मोठी मेहनत घेतली. संगमनेरकरांची या अभियानाला साथ मिळाली आणि कोट्यावधी रुपयांची बक्षिसे पालिकेच्या खात्यावर जमा झाली.

           स्वच्छ व हरीत शहराचा ध्यास घेतलेल्या नगराध्यक्ष तांबे यांनी घरोघरी जात संगमनेरकरांचे प्रबोधन करत ओला व सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे महत्व यावर भर दिला. कालांतराने ताई जेथे जात तेथे आला ओला कचरा सुका कचरा असे गमतीने म्हटले जाई. शहर स्वच्छता व हरीत संगमनेरसाठी नगराध्यक्ष दुर्गाताईंनी मोठी मेहनत घेतली. आता पालिकेतील त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपुष्ठात आला आहे. शहराचा बहुतांश भाग वृक्षराजीने बहरला असतांना आता नव्याने निवडणूका होईपर्यत पालिकेवर प्रशासकीय राज सुरु आहे. त्यातच पालिकेच्या कारभाराची सुत्रेदेखील मुख्याधिकारी बांगर यांची बदली झाल्याने नव्या दमाचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या हाती आली आहे. संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या हातात प्रशासकीय कारभार गेला आहे. अशा स्थितीत शहरात नगराध्यक्ष तांबे यांच्या कार्यकाळातील विकास कामे सुरु असतांना स्वच्छतेचे महत्वपुर्ण कामदेखील त्याच वेगाने सुरु असल्याचे दिसते.

                                                                                            विश्लेषण । अनंत पांगारकर

           २०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सज्ज असलेल्या पालिकेने स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानाचाच एक भाग म्हणुन निवासी भागत भल्या पहाटे एक वेळ आणि व्यापारी भागामध्ये सकाल-सायंकाळी दोनदा स्वच्छता केली जाते. शहराच्या निवासी भागातील ओला व सुका कचरा घंटागाड्याच्या मार्फत गोळा केला जात असून ओला, सुका, घरगुती घातक कचरा, ई कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीदेखील केली जात आहे. अभियानाअंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या व लगतच्या भिंतीवर भित्तीचित्राद्वारे जनजागृती केली जात असल्याने या भिंतीच संगमनेरकरांशी स्वच्छतेसंदर्भात संवाद साधु लागल्याचे दिसते. जनजागृती करणाऱ्या विविध चित्रांनी या भिंतीवर आकार घेतला आहे. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी व सफाई कर्मचाऱ्यांदेखील प्रशस्तीपत्र व त्यांना किट देवून सत्कार करण्यात आला आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटनेदेखील शहराच्या वैभवात भर घातली आहे.

           पालिकेच्यावतीने शहरातील प्रदुषण व हवेची गुणवत्ता चाचणी घेतली जाऊ लागली आहे. शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रिडासंकूल व प्रांताधिकाऱ्यांच्या प्रशासकीय भवनात प्रदुषण व हवेची चाचणी घेणारी उपकरणे बसविली गेली आहे. यातुन प्रदुषण व हवेची तपासणी करण्यात येत आहे. अभियानाअंतर्गत शिक्षण मंडळाच्या माध्यमातुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना बक्षिसे देवून गौरविले जात आहे. विद्यार्थी व महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी स्वच्छता दूत म्हणून पालिकेने साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांची निवड केली आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत उपक्रम सुरु आहेत. शहर, उपनगरातील गच्चीवरील बागा, घरगुती बायोगॅस प्रकल्प या अभियानाला हातभार लावत आहेत. गेल्या काही वर्षात रस्त्याच्या दुभाजकांवर वृक्षलागवड करण्यात आली होती. हे वृक्ष आता चांगलेच बहरले असून यातुन वेगळी अनुभूती संगमनेरकरांना मिळत आहे. वृक्ष लागवड सुरुच असली तरी शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या फ्लेक्सचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात पालिकेला यश आलेले नाही. स्वच्छ सुंदर संगमनेरच्या संकल्पनेला गालबोट लावणाऱ्या या  फ्लेक्स छाप तथाकथिक पुढाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन केल्यास शहराचा लौकीस आणखी वाढण्यास मदत होईल.

----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य