संगमनेरात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात वाढ
अनंत पांगारकर
संगमनेर :
गेल्या काही दिवसात संगमनेरात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यासाठी संबंधितांकडून पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो. राजकीय पक्षाशी बांधिलकी सांगणाऱ्या लोकांच्या माध्यमातून संबंधितांना कायदेशीर कारवाईत अडकविण्याची भीती दाखवत आर्थिक लुटीचे हे प्रकार सुरू असल्याचे दिसते.
गेल्या काही वर्षात संगमनेरमध्ये जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. यातून अनेक एजंट, मध्यस्थ, दलाल यांची साखळी कार्यरत आहे. यातून अनेकदा वाद-विवादाचे देखील प्रसंग उद्भवले आहे. बऱ्याचदा हे वाद पोलिस ठाण्यात पोहोचतात. आपसात मिटणाऱ्या या वादाला शहरातील काही असामाजिक तत्त्वे वेगळे वळण देत ही प्रकरणे पोलिस ठाण्यात नेत असतात. जमिनीशी संलग्न वाद हे न्यायालयात सोडविण्याऐवजी त्याला फौजदारी वादाचे स्वरूप देत पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या जातात. पोलिसांना हाताशी धरून संबंधितांवर आपला राग काढण्याच्या उद्देशाने विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, धमकावणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले जाते.
बऱ्याचदा अशा प्रकरणात पोलीस दोन्हीकडिल लोकांना बोलाऊन घेत सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला देत असतात. अशावेळी राजकीय पक्षाचे स्वयंघोषित पुढारी यातून मार्ग निघू देत नाहीत. त्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत ही प्रकरणे ताणून धरत असतात. त्यातून आर्थिक तडजोडी घडवून आणत असतात. अशा प्रकारच्या वादांमध्ये पोलिस ठाण्याची पायरी चढणाऱ्या सर्वच सामाजिक, राजकीय संघटनांच्या पुढाऱ्यांचा हेतू असा नसला तरी बहुतांशी पुढारी म्हणविणारे आणि समाजात फारशी किंमत नसणारे मोजके लोक यात अग्रेसर असल्याचे दिसते.
वास्तविक पाहता अशा व्यवहारांशी पोलिसांचा काहीएक संबंध नसतो. मात्र काही लोक अशा व्यवहारांचे भांडवल करत सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचे प्रयत्न करत असल्याने पोलिसांनादेखील अशावेळी आपला पोलिसी खाक्या दाखवावा लागतो. यातून बऱ्याचदा चुकीच्या प्रकारचे गुन्हेदेखील दाखल होत असतात. अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले की सामाजिक वातावरणदेखील बिघडत असते. जमिनीशी संबंधित वाद हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असले तरी यात आपसातील वादाचे स्वरूप देत ही प्रकरणे पोलीस ठाण्यात आणली जातात यासाठी ही सामाजिक तत्वे मोठी मदत करत असतात. महिलांना पुढे करत विनयभंगाचा कांगावा करण्याचे अथवा प्रकरणाला जातीय स्वरूप देणे, काहीच नाही झाले तर हाणामाऱ्या घडवून आणत प्रकरणे पोलीस ठाण्यात नेले पोलीस अधिकाऱ्यांची संबंधितांवर कारवाईसाठी दबाव आणणे पोलीस अधिकार्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार घडवून आणत प्रकरणे बाहेरच मिटविन्यावर भर दिला जातो.
(चौकट)
गेल्या काही दिवसात संगमनेरात अशी दोन-तीन प्रातिनिधिक प्रकरणे समोर आली आहेत. संगमनेर शहरात एका प्रतिष्ठित वकीलाला पोलीस ठाण्यात बोलावत अशाच प्रकारे आर्थिक तडजोड घडविण्यात भाग पाडले. विशेष म्हणजे यातदेखील अशात एका राजकीय पदाधिकारी म्हणविणार्या आणि समाज माध्यमातून पोलिसांवर टीका करणाऱ्या व्यक्तीचा सहभाग होता. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातदेखील वहिवाट असलेली जमीन ताब्यात ठेवण्यासाठी काही लोकांनी तब्बल पन्नास लाख रुपयांची मागणी करीत मारहाण केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झालेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा