काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे संकटमोचक नामदार बाळासाहेब थोरात
देशासह राज्यात लोकशाहीविघातक आणि बड्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या पक्षाची सत्ता आल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात असतांना राज्यात कॉग्रेससाठी कठीण काळ निर्माण झाला होता. कॉग्रेसची अवस्था बिकट स्थितीत असतांना नामदार साहेबांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. मूलतः संयमी आणि मितभाषी असलेल्या साहेबांकडे पक्षाची सूत्र आल्यानंतर ते ही जबाबदारी लीलया पेलतील याची आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना खात्रीच होती. मात्र तरीही बुडणाऱ्या जहाजाच्या कप्तान म्हणून त्यांना खिजवण्याचा ‘खूजा' प्रयत्न करण्यात आला. परंतु साहेबांनी दाखवून दिलं की जहाज कितीही हेलखावे खात असले तरीही कोलंबसाच्या गर्वगीताप्रमाणे ‘हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे’ म्हणत जहाजाचे शिड आणखी भक्कम करत त्यांनी यशस्वीपणे काँग्रेसच्या जहाजाला सत्तेच्या किनाऱ्यावर पोहचवलं!
कर्तृत्ववान माणसांना पद आणि प्रतिष्ठेपेक्षा त्यांनी जबाबदारीने केलेले कार्यच त्यांचा प्रभाव लोकांमध्ये दीर्घकाळ टिकवते. संगमनेर तालुक्याचे सातत्याने चार दशके लोकप्रतिनिधीत्व करणारे साहेब हे सहकारमहर्षी स्व. दादांचा लोककल्याणाचा वसा हाती घेऊन पुढे जात असतांना स्वतःची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण करत लोकांच्या मनात भक्कमपणे स्थान निर्माण केले. महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमध्ये आज महत्वाचा घटक म्हणून महसूलमंत्री असलेल्या साहेबांकडे पाहिले जाते. कार्यक्षेत्र राज्यव्यापी असतांनादेखील ते ग्रामीण भागाशी आपले नाते कायम टिकवून आहेच.
माझे आजोबा स्वर्गीय सदाशिवराव ढेरंगे पाटील हे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे पठार भागातील सहकारी. माजी पंचायत समिती सदस्य असलेल्या सदाशिवराव ढेरंगे पाटील यांच्या निष्ठावंत वृत्तीची नेहमीच दादांनी दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यानिर्मिती वेळी पठार भागातील अनेक मोठे नेतेमंडळी राष्ट्रवादीत सामिल झाल्यानंतरदेखील माझे आजोबा काँग्रेस पक्षाशी पयार्याने थोरात परिवाराशी एकनिष्ठ राहिल्याचे सर्वश्रुत आहे. दादांशी एकनिष्ठ राहीलेल्या सहकाऱ्यांचीदेखील साहेब नेहमीच जाण ठेवत असतांना त्यांच्यवर विशेष प्रेम करतांना दिसतात. दादांचे सहकारी असलेल्या सर्वच बुजूर्गांनी साहेबांनादेखील तेवढच्याच ममतेने साथ दिली. आजोंबाच्या एकनिष्ठतेची दखल घेत साहेबांचा माझ्यावरदेखील स्नेह राहीला.
पठार भागासह तालुक्यात विद्यार्थी काँग्रेसचे संघटनेचे काम करतांना माझ्यावर साहेब विश्वासाने जबाबदारी टाकतात. भोजदरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे पार पाडायची हा आम्ही ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय व साहेबांनी केलेले मार्गदर्शन हा माझ्या अनुभवात मोठी भर पाडणारा क्षण होता. साहेब नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पना, उपक्रमांना मला प्रोत्साहन देतात काही चुकले की सांगतात आणि शाब्बासकीदेखील देतात. राज्याच्या विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले थोरात साहेब हे वयाने आणि अनुभवाने कितीही मोठे असले तरीही त्यांचा उत्साह, काम करण्याचा आवाका एखाद्या युवकाप्रमाणे आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक युवक कार्यकर्त्याला आपल्यातले वाटतात. आमच्या पठार भागातील विकासकामे, लोकहिताचे निर्णय यात साहेब स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करतात.
मी बांधकाम व्यावसायिक असल्याने अनेकदा विकास कामांच्याप्रसंगी साहेबांची भेट होते. त्या दरम्यान नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाविषयी साहेब चर्चा करतात. माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की, मी मागील वर्षी नवीन चारचाकी वाहन खरेदी केले. त्यावेळी साहेबांनी स्वतः त्यात बसावे, अशी माझी इच्छा होती. साहेबांनी ती पूर्ण केली संगमनेर ते अकोले प्रवासादरम्यान नवीन वाहनाचे तंत्रज्ञान, वैशिष्ट्ये, ऍप्लिकेशन इत्यादी विषयी साहेबांनी चर्चा केली. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत नवीन पिढीशी समतोल राखण्याचे काम साहेब नेहमीच करतात हे यातुन मला दिसून आले. आपल्या आई वडिलांच्या पुण्याईनेच माणसं मोठी होतात. मात्र स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून ती जपणं व वाढवणं याची प्रेरणाच नामदार साहेब आपल्या कार्यशैलीने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देत असतात. आपल्या कार्यकर्तृत्वाने अवघा महाराष्ट्र व्यापून टाकणाऱ्या आणि तरीही तळागाळातील लोकांपर्यंत आपली नाळ जोडून ठेवलेल्या या कार्यकुशल नेतृत्वास, नामदार साहेबांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा!
- गौरव डोंगरे पाटील
अध्यक्ष, संगमनेर तालुका एन.एस.यु.आय.
8180919999
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा