कर्तुत्ववान समाजकारणी
महाराष्ट्राला कृतिशील विचारवंतांचा मोठा वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या विचारावरच आज समृद्ध महाराष्ट्राचा पाया भक्कमपणे उभा आहे. या विचारवंतांच्या यादितील एक सुवर्णपान म्हणजे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. संगमनेरकरांचे हे नेतृत्व आज केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर देखील यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा दाखविणाऱ्या आणि समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या कर्तुत्ववान समाजकारणी बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने...
पुरातन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या जोर्वे गावात जन्मलेल्या, संगमनेर शहरातील सर डी. एम. पेटिट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत, संगमनेर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत थेट पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करत असतानाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सभा घेत पाणीप्रश्न, परीक्षा फी माफी आदींवर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवणारा हा तरुण पुढे भविष्यात थेट राज्याच्या 'राजकारणात दीर्घ परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षातील प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे येईल', अशी भविष्यवाणी जर कोणी केली असती तर त्यावर फारसा कोणी विश्वास ठेवला नसता. राजकीय वारसा असला तरी तो सिद्ध करण्याची क्षमता राजकारणात निर्माण करावी लागते. या कसोटीला पुरेपुर उतरणाऱ्या साहेबांचे राजकीय पटलावरील आजचे स्थान लक्षात घेता संगमनेरचे नाव राजकारणात यशोशिखरावर दिमाखात का झळकते याचा उलगडा होतो. शांत, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व या त्रिसूत्री मध्येच त्यांच्या यशाचा आलेख दडलेला आहे
भविष्यात राजकारण हेच आपले कर्म असेल याची पुसटशी देखील कल्पना नसलेल्या बाळासाहेबांनी वकिलीची पदवी हाती पडताच संगमनेरमध्ये वकिली व्यवसाय सुरू केला. वडील भाऊसाहेब थोरात राजकारणाबरोबरच समाजकारणात अग्रभागी असल्याने त्यांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा संच दादांसोबत होता वकिलीपेक्षा या कार्यकर्त्यांच्या कायदेशीर अडचणी सोडविणे यात साहेबांचा वेळ जाऊ लागला. दरम्यान साहेबांनी देखील संगमनेरात आपला मोठा मित्र परिवार जोडला होता. याच वेळी साहेबांसाठी एक वेगळे वळण आले. १९८५ ची विधानसभा निवडणूक लागली होती. तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. भाऊसाहेब थोरात यांनी कारखाना आणि विविध संस्थांच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी मोट बांधली होती. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. खताळ यांचा नकार आणि पक्षश्रेष्ठींनी स्थानिक उमेदवाराला संधी न देता लादलेला उमेदवार यामुळे ही निवडणूक संगमनेरकरांसाठी टर्निंग पॉइंट ठरली.
विधानसभेसाठी काँग्रेसकडून मंचरच्या शकुंतला थोरात यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसने स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिल्याची परिणती बाळासाहेब थोरात यांच्या उमेदवारीमध्ये झाली. थोरात समर्थकांनी शकुंतला थोरात यांच्याविरोधात बाळासाहेब थोरात यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडले. बाहेरच्या उमेदवाराविरोधातील रोष आणि स्थानिक उमेदवार डावलल्याने काँग्रेस विरोधात बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी समोर आल्यानंतर संघर्षमय झालेल्या निवडणुकीत थोरात साहेबांनी तब्बल दहा हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला आणि येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो आजतागायत अखंडित सुरू आहे. संगमनेरकरांचे नेतृत्व करण्याची संधी दीर्घकाळ थोरात यांना मिळाली आहे.
या निवडणुकीनंतर साहेबांनी मागे वळून बघितलेच नाही, त्यांच्या यशाची पताका आजपर्यंत अभेद्य राहिली आहे. अल्पावधीतच त्यांना राज्यमंत्री पदाची संधी चालून आली. अनेकदा भूमिपूजन झालेल्या आणि संगमनेर-अकोलेकरांसाठी मृगजळ वाटणार्या निळवंडे धरणाच्या कामाचा त्यांनी श्रीगणेशा केला. साहेबांच्या राजकीय कारकिर्दीतील निळवंडे धरण हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सुवर्णाक्षराने लिहिले जाणारे यश आहे. आधी पुनर्वसन मग धरण हा नवा पायंडादेखील त्यांच्यामुळे पडला. या धरणामुळे केवळ संगमनेरचा नव्हे तर उत्तरेतील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागत आहे. धरण पूर्णत्वास गेले, आता कालव्याचीदेखील कामे वेगाने सुरू असून पुढील वर्षीपर्यंत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे हा साहेबांचा ध्यास बनला आहे. तोही यथावकाश मार्गे लागेलच. संगमनेर करांसाठी मंत्री थोरात यांच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी उपलब्धी आहे.
जलसंधारण मंत्री असताना त्यांनी जलसंधारणाच्या कामात मोठी वाढ केली. राज्यभरात साखळी बंधाऱ्यांची निर्मिती देखील त्यांच्याच कार्यकाळात झाली. मराठवाडा, विदर्भासाठी स्वतंत्र पाणलोट मिशन कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. रोजगार हमी मंत्रिपदाच्या काळात मागेल त्याला शेततळे हा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला. याची परिणती संगमनेर तालुक्यात दिसून आली, दुष्काळी पट्टा असलेल्या संगमनेरमध्ये जागोजागी शेततळे निर्माण झाले. यातून समृद्धी निर्माण होण्यास मदत झाली. राज्यभरात शेततळ्यांचे मोठ्या प्रमाणात काम झाले. कृषी खात्याचे मंत्रीपद सांभाळतांना राज्यात एक लाख शेतकऱ्यांची निर्मिती झाली. कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा मिळू लागला. कृषी विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आली. जमिनीचा पोत आणि माती परीक्षण केंद्र सुरु झाली. शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलेली महापीक अभियान योजना राबविली गेली. कृषी दिंड्या व शिवार फेरीच्या माध्यमातून अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर दिसू लागले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी संचार योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली. शेतकऱ्यांना पीक विमा, अपघाती विमा योजना, महापीक बाजार आदी योजनांचा लाभ देताना राज्याच्या इतिहासात त्यांचा कार्यकाल हा सर्वात जास्त कृषी उत्पादनाचा ठरला.
शिक्षण मंत्री असताना त्यांनी मूलभूत शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्वांना मोफत शिक्षण, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, अपंग समावेशित शिक्षकांना मानधनात वाढ, शिक्षकांना ऑनलाइन वेतन योजना, तसेच शाळाबाह्य मुलांना वयानुसार इयत्तामध्ये प्रवेश या निर्णयासह दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला बेस्ट ऑफ फाईव्ह हा निर्णय लक्षवेधी ठरला. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांच्याकडे सोपविल्या गेलेल्या सर्व खात्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. साहेबांसाठी सर्वात लक्षणीय ठरली ती महसूल मंत्रीपदाची कारकीर्द.
महसूल मंत्री म्हणून काम करताना सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवत यांनी या खात्याला नवी ओळख निर्माण करून दिली. ब्रिटिश कालानंतर न झालेली जमिनीची मोजणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच कार्यकाळातील. ऑनलाईन सातबारा, ई चावडी, ई फेरफार, ई सेवा केंद्र, तलाठ्यांना लॅपटॉप, विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याचा निर्णय, तब्बल ऐंशी लाखाहून अधिक दाखल्यांचे वाटप, महसूल विभाग इनलाईन ऐवजी ऑनलाईन करण्यासोबतच महसूल खात्यात केलेल्या लक्षवेधी कामाची दखल घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली निवड अभिमानास्पद ठरली आहे.
अनंत पांगारकर
7588600950
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा