संगमनेरात गोवंश हत्या सुरुच, मांसासह चार लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला
संगमनेर : संगमनेरमधून सुरु असलेल्या गोमांस वाहतुकीवर तालुका पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत दीड लाखाच्या पिकअपसह सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेण्यात आले आहे. कोपरगांवच्या दिशेने जाणाऱ्या या पिकअपमधून सकृतदर्शनी भुश्याची वाहतुक केली जात असल्याचे भासविले जात होते. पोलीस कारवाईमुळे गोमांस वाहतुक करणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. भुश्याच्या पांढऱ्या गोण्याखाली पोलिसांना गोवंश जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांस दडवून त्याची वाहतुक केली जात असल्याचे समोर आले आहे.
अनेकदा केलेल्या कारवायानंतरही संगमनेरातील कत्तलखाने
सुरुच आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या पोलीस कारवायादेखील फार्स ठरत आहेत. आत्तापर्यतच्या
शेकडो कारवायानंतरदेखील येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. शहर पोलीस हे कत्तलखाने
बंद असल्याचे वरिष्ठांना भासवत असले तरी या कत्तलखान्याचा प्रश्न मध्यंतरी ऐरणीवर आल्यावर
झालेल्या आंदोलनावेळी थेट पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख आणि पोलीस उपअधीक्षक राहुल
मदने यांच्या मोठ्या आर्थिक हप्तेखोरीचे आरोप झाले होते. त्यामुळे थातुरमातुर कारवाया
करत पोलीस प्रशासन येथील कत्तलखाने बंद असल्याचे वरीष्ठांना भासवत असल्याचे त्यांच्याच
कारवायावरुन दिसते.
मंगळवारी मध्यरात्री एका पिकअपमधून कोपरगांवच्या दिशेने
गोमांसाची वाहतुक एका पिकअपद्वारे केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल
मदने यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती आपल्या पथकाला व तालुका पोलिसांना देत
कारवाईचे आदेश दिले होते. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार
विष्णु आहेर यांच्यासह उपअधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे, राहुल
गाडेकर, आढाव आदींनी वडगाव पान फाटा ते कोपरगांव या मार्गावरील डी. के.मोरे विद्यालयाजवळ
सापळा रचला. रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी संशयित पिकअप आल्यानंतर
पोलिसांनी ती अडविली. वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने भुश्याची वाहतुक करत असल्याचे
सांगितले. मात्र माहिती पक्की असल्याने पोलिसांनी भुश्याच्या गोण्या उचकायला सुरुवात
केली असता त्या गोण्यांखाली मोठ्या प्रमाणात दडवून ठेवलेले गोमांस मिळून आले. पोलीसांनी
घटनास्थळाचा पंचनामा करत पिकअप आणि सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे गोमांस असा तीन लाख
नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त करत वाहनचालक कुरेशी याला ताब्यात घेतले.
(चौकट)
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी कुरेशी याच्याकडे
अधिक चौकशी केली असता त्याने हे मांस भारतनगर, संगमनेरमधील तौसिफ ताहीर कुरेशी याच्या
मालकीचे असल्याची माहिती दिली. त्यामुळे संगमनेरातुनच हे मांस कोपरगांवकडे जात होते.
पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा