माझी पहिली चप्पल!

नवीन मराठी शाळेत असताना आम्हीं बरीचशी मुले अनवाणी पायांनीच शाळेत जात असू...त्यात काही वावगं वाटत नसे कुणालाही. शाळेत जाण्याच्या अगोदर सुध्दा अनवाणीच असायचो... किंबहूना लहान मुलांसाठी चपला नसतातच असा सर्वच त्याकाळातील लहान मुलांचा समज असायचा...नवीन मराठी शाळेतही सर्व शाळेत मिळून अगदी वकील, डॉक्टर, श्रीमंत यांची एकूण फारतर दहापाच मुलं मुली चप्पल/सँडल/बुट घालून येत असत. सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने बघत असत पण ते तेवढ्या पुरतंच... आपल्या पायात चपला नाहीत याचं कुणालाही वैषम्य वाटत नसे...चौथी इयत्ता पास होऊन ' पेटिट विद्यालयात ' जाऊ लागलो तरी यात फारसा बदल झाला नव्हता...



मी इयत्ता सहावीत असेल...त्यावेळी आमचा इयत्ता ६ वीचा दुपारचा वर्ग वरच्या मजल्यावर होता...वर्ग खोली क्रमांक १०५ कडेचा..अगदी जिन्याशेजारचा वर्ग होता...एक दिवस सायंकाळी शेवटचा तास संपल्याची बेल वाजली आणि पहिल्या बेंचवर असलेला मी पळत पळत...उड्या मारत खाली आलो... जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उडी मारुन...तेथे असलेल्या सिमेंटच्या खांबाला धरुन एकच पायरी उतरुन असणाऱ्या आणि मागच्या गेट कडे जाणाऱ्या 'उत्तम मुंगी कला मंदिर' समोरील मैदानावर पाऊल टाकणार...तर तेवढ्यात मला तेथे निळ्या रंगाच्या अगदी माझ्या पायाला फिट्ट बसतील अशा त्याकाळात प्रचलित असलेल्या ' स्वस्तिक ' कंपनीच्या स्लिपर दिसल्या...मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या स्लिपर पायात घातल्या...आणि दफ्तर घेऊन शाळेच्या गेट बाहेर आलो आणि घराच्या रस्त्याला लागलो...जसजसा घराच्या जवळ येऊ लागलो तसतसं घरात स्लिपर बद्दल काय सांगायचं? हा प्रश्न पडला...मी मनातून घाबरलो...पण जे खरं आहे ते सांगायचं ठरवलं...कारण एकतर मी चोरी केली नव्हती...घरात पाय ठेवताच घरातील भावंडांनी माझ्या पायात स्लिपर कुणाची? हे विचारायला सुरुवात केली...त्यांनी आई पर्यंत तक्रार नेली...आईनेही मोठयाने, " कुणाच्या चपला घालून आलास?" असं विचारलं...मी सरळ शाळा सुटल्यावर मला त्या शाळेच्या मैदानाच्या कडेला दिसल्या व मी पायात घालून आलो, असं सांगितलं...आईला मी खरं बोलतोय याची खात्री पटली...त्यानंतर ऑफिस मधून वडिल आल्यानंतर वडिलांकडे माझ्या भावंडांनी पुन्हा तक्रार केली...आईने जे विचारलं तेच वडिलांनीही विचारलं...मी ही जे खरं आहे तेच सांगितलं...वडिलांनी सांगितलं "उद्या शाळेत स्लिपर घालून गेल्या नंतर ज्या मुलाची स्लिपर आहे, त्याच्या लक्षात आलं तर तत्काळ त्याची स्लिपर कोणतीही हूज्जत न घालता परत करावयाची" अशी ताकीद दिली...मी हो म्हणालो आणि माझा जीव भांड्यात पडला...झोपताना स्लिपर डोळ्यासमोर येत होती...मी कुणाची स्लिपर चोरली नाही...असं समाधान करुन घेत होतो...आणि ज्याची स्लिपर असेल त्याने ओळखली व मागितली तर परत द्यायची असं मनाशी ठरवून झोपी गेलो...पण दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना ती स्लिपर मूळ मालकाला ओळखू येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करत होतो...ती स्लिपर तशी अगदी नवीन नव्हती पण घेऊन दोन तीन महिने वापरलेली होती...पण अत्यंत चांगल्या स्थितीत होती...सुदैवाने मी ती स्लिपर पुढे एकदोन वर्ष वापरली असावी...शेवटी शेवटी तळवे तर झिजलेच पण बेल्टचा बट त्या तळव्यांच्या तीन पैकी कोणत्याही एखाद्या छिद्रातून...छिद्रं मोठी झाल्यामुळे निघून येऊ लागला...मग त्या बेल्टच्या बटला खालून सेफ्टी पिन लावायची व स्लिपर वापरायची...कधी कधी थोडंसं पळालं तरी स्लिपरचा बेल्ट निघून यायचा...मग कंपास मध्ये तीन चार सेफ्टी पिन ठेवलेल्या असायच्या...पटकन रस्त्याच्या कडेला जाऊन एखाद्या मित्राच्या मदतीने बेल्टच्या बटला तळाखालून पिन लावून दुरुस्ती करुन घ्यायची...आणि पायात घालून अतिशय जपून पावलं टाकत शाळेत पोहचायचो...कधी कधी कंपास नसेल तर किंवा शाळे व्यतिरिक्त मित्रांबरोबर असताना स्लिपर तुटायची... त्यावेळी त्या मित्रांच्या मागे मागे राहून लपत छपत कुणालाही दिसणार नाही असं एक पाय ओढत ओढत चालत राहायचो...

 

क्रिकेट किंवा इतर खेळ खेळताना तर स्लिपरचा काहीच उपयोग नसे...त्यावेळी अनवाणी पायांनीच खेळायची सवय होऊन गेली होती...


अखेर मला सापडलेल्या स्लिपरचे आयुष्य तिच्यावरील अनेक शस्त्रक्रियेनंतर व अत्याचारानंतर संपुष्टात आले...त्यावेळी मी इयत्ता आठवीत असेल...सापडलेल्या स्लिपरने माझे शालेय जीवनातील दोन वर्षे मला साथ दिली होती...


आता वर्गातील निम्म्या मुलांकडे चप्पल/बूट आले होते...आणि हळू हळू मलाही स्लिपरची सवय झाली असल्याने परंतू तिचे आयुष्य संपल्यामुळे नवीन चप्पल घेण्यासाठी वडिलांच्या मागे लागलो... वडिलांनी माझा प्रस्ताव सुरवातीला दोन तीन महिने तर फेटाळून लावला...त्यानंतरही  चिकाटीने मी मागणी लावून धरल्याने किंवा गोडी गुलाबीने कबूल करून घेतल्याने वडिलांनी बघू असे आश्वासन दिले...त्यानंतरही एकदोन महिने गेले असतील एक दिवस सुटीच्या दिवशी ते मला घेऊन नेहरु चौका पुढे असलेल्या तेलीखुंटा वरील कोपऱ्यावरच्या बोहरीच्या चप्पल दुकानात घेऊन गेले. तेथे त्या बोहऱ्याने माझ्या मापाच्या बऱ्याच प्रकारच्या चपला व सँडल दाखविले...त्या नवीन चपलांचे व सँडलचे प्रकार पाहून मी हरखून गेलो...वडिल म्हणाले, "आपण तुला चप्पलच घेऊ कारण सँडलचे बंद तुटले तर सँडल फेकून द्यावी लागेल"...त्यांनी मला चप्पल पसंत करायला सांगितली...मी वडिल वापरायचे तशी मऊ कातड्याची तपकिरी रंगाची चप्पल पसंत केली त्याला त्यावेळी 'प्युर लेदरच्या' चपला म्हणत...वडिलांनी किंमती विषयी घासाघीस करुन ती चप्पल माझ्यासाठी घेतली...मी आनंदाने उड्या मारतच घरी आलो...घरी सर्वांनाच चप्पल आवडली...मी सुरवातीला वर्षभर शाळेत जातांनाच चप्पल घालू लागलो...गल्लीत खेळायला जातांना, क्रिकेट खेळताना अनवाणी पायांनीच खेळायचो... रोज चपला फडक्याने स्वच्छ पुसायचो, दर एक महिन्याने वडिलांसारखे माझ्या चप्पलला मोठ्या भावांकडून पॉलिश करुन घेऊ लागलो...ती चप्पल मी दहावी पर्यंत वापरली असेल...कारण माझी उंची व शरीरयष्टी फारशी वाढत नव्हती...माझे इतर मित्र भराभर वाढत होते...मी इयत्ता अकरावीत गेलो असताना त्यावेळी पावसाळी प्लॅस्टिक बुटांची फॅशन आली होती...गल्लीतील माझ्या मोठया भावाच्या मित्राने तसे पावसाळी प्लॅस्टिकचे बुट आणल्यामुळे मी ही वडिलांच्या मागे लागून हट्टाने तसे पांढऱ्या रंगाचे पावसाळी प्लॅस्टिक बुट आणले, वडिल नको नको म्हणत असतानाही!...विशेष म्हणजे मी पावसाळी बुट घेतले पण त्या वर्षी म्हणजे १९७२ च्या पावसाळ्या मध्ये पाऊस फारसा पडलाच नाही...मोठा दुष्काळ पडला...लाल मिलो, सुकडी रेशन दुकानात रेशकार्ड वर मिळू लागली...अनेक वेळेस आम्हाला तासनतास रेशन दुकानांत रांगा लावाव्या लागल्या...विशेष म्हणजे त्यावर्षी इतका मोठा दुष्काळ असूनही नदी बाराही महिने दुथडी भरुन वहात होती कारण त्यावेळी शेती फारशी सिंचनावर नव्हती...शेतीसाठी पाण्याच्या पाइप लाइन नव्हत्या...कारण विहीर बागाईत व पावसावरच शेती होती...पाण्याचा सुकाळ होता...परंतू अन्नधान्याचा सार्वत्रिक भिषण दुष्काळ पडला होता...परिणामी आमच्या अकरावी बोर्डाच्या मार्च १९७३ मध्ये होणाऱ्या परीक्षा दोनदा पुढे ढकलल्या गेल्या...बहुधा एप्रिल महिन्याच्या शेवटी झाल्या...


माझे इयत्ता अकरावीत घेतलेले प्लॅस्टिक बुट बहुतेक सहा महिनेच टिकले असतील...कारण त्याला चिरा पडायला लागल्या...एक दोनदा चांभारकडून शिवून घेतल्या...पण टिकल्या नाही...आता लगेच मला कोणी चप्पल घेणार नव्हतं...मी मग मोठ्या भावांच्या त्यांनी टाकून दिलेल्या जुन्या चपला चांभारकडून शिवून घेऊन वापरु लागलो...त्यातही फारसा दम नसायचा मग कधी कधी रात्रीच्या वेळी घरातून काही काम सांगितलं तर मोठया भावांच्या चपला त्यांच्या नकळत घालून जायचो...फार भारी वाटायचं...पण मोठया भावांच्या लक्षात आलं तर त्यांचे बोलणे खावे लागायचे...कॉलेजला गेल्यावर त्यावर्षी मोठ्या भावाचं लग्न झालं...त्याचे लग्नाचे बुट मी कॉलेज मध्ये वापरायला सुरुवात केली...बहुतेक चारही वर्षे मी त्याचेच बुट कॉलेज मध्ये जातांना वापरले... ते भावाच्या लग्नाचे बुट वापरत असल्याने मला सर्व मुलं नवरदेव म्हणत... पण मी तिकडे दुर्लक्ष्य करीत असे...

इतर वेळी मोठया भावांच्या जुन्या चपला वापरत असे...


नंतर १९८४ साली माझा विवाह झाल्या नंतर माझ्या लग्नाचे बुट व त्यानंतर आजतागायत तपकिरी बुटच वापरतोय...फिरायला जायला अदीदास, स्पार्क, नायके चे चार चार हजार रुपये किंमतीचे स्पोर्ट्स शूज वापरले अजूनही एका एकावेळी दोन तीन जोड वापरतोय...तीन वर्षांपूर्वी पुण्यात मुलाबरोबर फिनिक्स मॉल मध्ये ' लुईस फिलिप ' कंपनीचा पाच हजार रुपये किंमतीचा बुट घेतला व अजून वापरतोय... तसेच दोन तीन जोडतीन वर्षांपूर्वी पुण्यात मुलाबरोबर फिनिक्स मॉल मध्ये ' लुईस फिलिप ' कंपनीचा पाच हजार रुपये किंमतीचा बुट घेतला व अजून वापरतोय तसे दोन तीन जोड आहेत...घरातही सातशे रुपयांची स्लीपर वापरतोय...


पण अजूनही स्मरणात आहे ती माझी शाळेत सापडलेली निळ्या रंगाची ' स्वस्तिक ' कंपनीची मला दोन वर्षे साथ देणारी स्लिपर...


राजेंद्र फरगडे,

९९७०१९२८४०

संगमनेर.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य