कोणत्याही कारणाने बिघडू शकते संगमनेरची कायदा व सुव्यवस्था
संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना बजावल्या 149 च्या नोटिसा
संगमनेर | अनंत पांगारकर
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिस प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्या पोलिस प्रशासनाला येथील कायदा-सुव्यवस्था कोणत्याही किरकोळ घटनेमुळे बिघडू शकते याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सण-उत्सव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भोंग्यामुळे पोलीस प्रशासनाने येथील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना 149 च्या नोटिसा बजावल्या आहेत. यदा कदाचित जर शहरात काही घडलेच तर याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल असा इशाराही पोलीस निरीक्षकांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसात संगमनेरमध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदविले गेले आहे. धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या नोटिसा देणे हा पोलिसांचा नित्यक्रम असला तरीदेखील या वेळच्या या नोटिसाना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण गेल्या काही दिवसात पोलीस अधिकारी विरुद्ध संगमनेरकर असा संघर्ष येथे अनुभवण्यास मिळत आहे. विशेषता येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर नासिक नगरच्या पथकाने टाकलेल्या छाप्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे जन आंदोलन देखील करण्यात आले. त्यावेळी संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र नंतरच्या काळात तसे काही घडले नाही.
त्यामुळे ब्रिटिश काळात इतिहास निर्माण केलेल्या संगमनेरच्या हनुमान विजय रथा वेळी संबंधित अधिकाऱ्यांना मानाचा ध्वज लावू दिला जाणार नाही असा इशारा देण्यात आला होता यामुळे पोलिस प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यावे लागले आणि या अधिकाऱ्यांना दूर ठेवून महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हस्ते हा मानाचा ध्वज पोलीस प्रशासनाला लावावा लागला. येथील पोलीस अधिकाऱ्यांच्याबाबत संगमनेरकरांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या सहीने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी काढण्यात आलेली मिरवणूक आणि या मिरवणुकी दरम्यान समाजकंटकांकडून घडलेला प्रकार. यामध्ये देखील संदिग्धता असून पोलिस कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अकोले नाका येथील प्रकरण, काही दिवसांपूर्वी आंदोलन छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षकांनी केलेली दमबाजी आदींसह अनेक प्रकरणात पोलीस यंत्रणेचे अपयश दिसून आले आहे. यामुळेदेखील शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले. शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांचे वर्तन नेहमी चर्चेचा विषय ठरत आले आहे.
पोलीस निरीक्षक देशमुख यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे की, पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, या बाबीची खबरदारी घेणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आपण एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहात. सध्या महाराष्ट्रात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडी तसेच आगामी काळात कामगार दिन मुस्लिम धर्मीयांचा रमजान ईद आणि त्याच दिवशी हिंदू धर्मीयांचा अक्षय तृतीया सण उत्सव साजरा होणार आहे.
3 मे 2022 पावेतो धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे हटविण्याच्या संबंधाने कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला इशारा यामुळे महाराष्ट्राचे राजकीय तसेच जातीय स्थिती संवेदनशील झाली असून राज्यात नुकत्याच घडणार्या घटनांचा आढावा घेता कोणत्याही किरकोळ घटनामुळे संगमनेर शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी खात्री झाली आहे.
त्यामुळे संबंधीताकडून कोणत्याही प्रकारे शहर परिसरातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहचेल असे गैरकृत्य करू नये तसेच आपल्या कार्यकर्त्यानादेखील अवगत करावे. याउपर आपण अथवा आपले पाठीराखे कार्यकर्ते यांनी शहरात तसेच तालुका परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केल्यास त्यावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधितास जबाबदार धरून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सदर नोटीस पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात येणार असल्याचे देखील निरीक्षक देशमुख यांनी म्हटले आहे.
याशिवाय शहरातील काही लोकांवर चॅप्टर केस देखील केल्या जाणार असल्याची माहिती समजली आहे. दरम्यान किती आणि कोणाला नोटिसा बजावल्या गेल्या आहे याची माहिती मिळण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मेसेजद्वारे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
दरम्यान पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी या संदर्भात सांगितले की, पोलिसांच्या चार टीम नोटिसा बजावण्याचे काम करत आहे. याची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरा मिळू शकेल, तसेच चार चॅप्टर केसेस करण्यात आल्या आहेत.


संगमनेर येथील ...पोलीस प्रशासनाचा हा निर्णय व १४९ कलम अंतर्गत पाठविलेल्या ... नोटीसा .म्हणजे ..... मरायचे अगोदर ....स्मशानात स्वतः चे हाताने स्वतः चे सरण रचने.....अशी परस्थिती संगमनेर शहरात निर्माण झाली आहे
उत्तर द्याहटवा