संगमनेरात शांतता समितीच्या बैठकीवेळी एसपी निर्णयाविना परतले
बैठकीकडे संगमनेरकरांनी फिरविली पाठ
संगमनेर | अनंत पांगारकर
महाराष्ट्र दिन रमजान ईद आणि अक्षय तृतीया या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बोलावलेली शांतता समितीची बैठक संगमनेरकरांनी पाठ फिरविल्याने बारगळली आहे. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना बैठक न घेताच पुन्हा माघारी परतावे लागले आहे. यातून स्थानिक पोलीस प्रशासनाचे अपयश पुन्हा एकदा समोर आले.
रमजान ईदच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या आदेशावरून पोलिस प्रशासनाने नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनातील सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीची निमंत्रणे देखील संबंधितांना देण्यात आली होती. मात्र सायंकाळी चार वाजता होणारी बैठक पाच वाजून गेले तरीदेखील सुरु होऊ शकली नाही. बैठकीसाठी आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बराच वेळ बसुन होते.
मात्र काही निवडक व्यक्तींचा अपवाद वगळता बहुतांशी शांतता समितीशी निगडित सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. तब्बल तासाभराची वाट बघून देखील अवघ्या दोन नगरसेवकांचा अपवाद वगळता कोणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाही. एकीकडे पोलीस अधीक्षक अधीक्षकांच्या दालनात बसून असताना दुसरीकडे पोलिस कर्मचाऱ्यांची शहरातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी फोनाफोनी सुरू होती मात्र कोणीही त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील एक एक करून काढता पाय घेतला.
त्यामुळे शांतता समितीची बैठक रद्द करण्याची आफत स्थानिक पोलिसांवर ओढावली. बैठकीसाठी पोलीस पाटलांनी आपल्या गावातील सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांना घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे पोलीस निरीक्षकांचे आदेशदेखील पाळले गेले नसल्याचे दिसून आले.
दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक देशमुख यांनी शहरातील अनेक प्रतिष्ठित राजकीय पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी 149 च्या नोटिसा बजावत, शहरात जर अनुचित प्रकार घडला तर या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा या नोटीसीमधून दिला होता. त्यामुळेदेखील या पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली असल्याची चर्चा होती. कोणत्याही प्रकारची चर्चा न करता अनेकांनी बैठकीला न येणे पसंत केले त्यामुळे पोलिस निरीक्षक आणि पोलिस प्रशासनाचा नागरिकांशी योग्य समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, त्यासंबंधीचे निकष, आधी घेण्यात आलेल्या निर्णयावर झालेली अंमलबजावणी यासंबंधीचे प्रश्न सातत्याने उपस्थित होत असतात. मात्र याचे कोणतेही ठोस उत्तर अधिकाऱ्यांकडे नसते. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट असल्याने ते त्यांचा निर्णय लादत असतात अशीदेखील अनेकांची भावना आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी तासभर वाट बघून देखील प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आदी प्रशासनातील अधिकारीदेखील आलेले नव्हते. संगमनेर नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याच्या निवृत्ती समारंभात हे सर्व अधिकारी असल्याचे कारण पोलिसांकडून देण्यात आले. या कारणामुळे देखील पोलिस प्रशासनाला वेळेचे गणित साधता आले नाही.
येथील पोलिस अधिकाऱ्यांबद्दल येथील जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे संगमनेरची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्या अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही जाणार नसल्याच्या प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिल्या.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा