पोलीस निरीक्षक देशमुखांच्या संपत्तीच्या चौकशीची तक्रार लाचलुचपतकडे



सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केली होती मागणी


संगमनेर :

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख गेल्या काही दिवसांपासून चांगलेच अडचणीत सापडले आहेत. येथील गोवंश जनावरांची हत्या आणि बेकायदा सुरु असलेले कत्तलखाने यामुळे संगमनेरकरांच्या ‘रडार’वर सापडलेल्या निरीक्षक देशमुख यांनी पदाचा गैरवापर करुन कमविलेल्या संपत्तीच्या चौकशीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी थेट ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’चे दार ठोठावले आहे. त्यांनी पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर ती नाशिक विभागाचे लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.


खताळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, निरीक्षक देशमुख यांची नियुक्ती संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १३ नोव्हेंबर २०२० रोजी झाली असून त्या दिवसापासून त्यांचे वास्तव्य शहरातील नाशिक-पुणे मार्गावरील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या ‘पंचवटी’ या बड्या हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे किमान अडीच हजार रुपये एवढे आहे. आत्तापर्यतच्या पोलिस अधिकाऱ्यांचा रहीवास हा शासकीय निवासस्थानी, शहरातील भाड्याने घेतलेल्या सदनिकेत अथवा अगदीच अडचण आली तर शासकीय विश्रामगृहात राहीला आहे. मात्र हे पहिलेच पोलीस निरीक्षक असे लाभले आहे की, सुरुवातीपासून यांचा रहीवास हा या बड्या हॉटेलमध्ये राहीला आहे. त्यांचे आत्तापर्यतचे रहीवासाचे बिल सुमारे ८ लाखावर झाले आहे. एका सामान्य पोलीस निरीक्षकास या हॉटेलमधील रहीवास कसा परवडू शकतो. याचाच अर्थ ते पदाचा गैरवापर करुन भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवित आहे हे सिध्द होते. यासंदर्भात खात्री करण्यासाठी संबधित विभागाने या हॉटेलमधील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची व देशमुख यांच्या मोबाईलची तपासणी करावी. यावरुन त्यांचे वास्तव्य सिध्द होऊ शकते.   


यापुर्वी देशमुख यांच्याविरोधात राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने ते दरमहा ५५ लाख रुपयांचा हप्ता घेत असल्याची तक्रार नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक व गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी शहरातील कत्तलखाने राजरोजपणे सुरु होते, जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटलेल्या खात्रीशीर माहितीवरुन ही बाब नाशिक आणि नगर पोलिसांच्या छाप्यानंतर समोर आली. या छाप्यात काही महत्वाचा दस्तावेज हाती लागला. त्यामुळे कत्तलखाने बंदसाठी पुकारलेल्या बजरंग दल आणि भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनावेळी निरीक्षक देशमुख कत्तलखाना चालकांकडून दरमहा २७ ते ३० लाख रुपयांचा हप्ता घेत असल्याचे आरोप झाले आहे. आंदोलनानंतर काही काळ बंद असलेले कत्तलखाने पुन्हा कसे सुरु झाले असा प्रश्न उपस्थित करत शहरातील अवैध धंद्यासंदर्भात माध्यमांमध्येदेखील सातत्याने वृत्त प्रसिध्द होत असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.


निरीक्षक देशमुख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत अमाप संपत्ती कमविली आहे. ऑक्टोंबरमधील आंदोलनावेळी त्यांच्या पंचवटीतील निवासाबद्दल प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी त्यांनी माझे राजकीय संबध असल्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नसल्याची वल्गना केली होती. देशमुख यांचा संगमनेरातील दरमहा खर्च हा साधारणत: पाऊण लाखाच्या घरात असून या खर्चाचा आणि त्यांच्या पगाराचा मेळ कसा बसतो. त्यांनी पोलीस विभागात नोकरीला लागल्यापासून करोडो रुपयांची संपत्ती जमविली असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर लाचलुचपतने नि:पक्षपातीपणे चौकशी करुन कारवाईची मागणी खताळ यांनी केली.



… तर माझ्या जीवाला धोका; जबाबदारी देशमुखांचीच

पोलीस निरीक्षक देशमुख हे नेहमी सांगतात की, माझे राजकीय, पोलीस विभाग आणि लाचलुचपत विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संबध आहेत. त्यामुळे माझे कोणीच काही करु शकत नाही. कोणी कितीही तक्रारी करा, मला फरक पडत नाही. त्यामुळे मी केलेल्या या तक्रारीमुळे ते माझ्यावर एखादा खोटा गुन्हा दाखल मला अडकवु शकतात अथवा माझ्या जिवीताला धोका निर्माण करु शकतात. त्यामुळे माझे काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस निरीक्षक देशमुख यांचीच असेल असे अमोल खताळ यांनी म्हटले आहे.

----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

लेखापरीक्षकाला एक वर्षाची कैदेची शिक्षा

मुख्यमंत्र्यांसारखे दिसणे आणि वागणे पडले महागात

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले