लुटीचा बनाव केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला
![]() |
| चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींसह पोलिस पथक |
चोरी गेलेली रक्कम तालुका पोलिसांनी १२ तासात केली हस्तगत
संगमनेर :
पाठीमागून आलेल्या दोन पल्सरवरील चौघांनी घाटामध्ये गाडी अडवत मारहाण करून ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविली. आणि दोन्ही पल्सर स्वार लोणीच्या दिशेने पसार झाले अशी आपबिती तक्रारदाराने पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सांगितली आणि सारी पोलिस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी गुन्ह्याची एक- एक कडी उलगडत नेली आणि दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा दरोडेखोर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर स्वतः फिर्यादीच होता.
सोहेल याकुब शेख (वय २९ वर्षे रा. एकता नगर' संगमनेर) असे या फिर्यादी दरोडेखोरांचे नाव आहे. त्याचे आणखी दोन साथीदारही या गुन्ह्यात निष्पन्न झाले असून समीर याकुब शेख (वय २४ वर्ष रा. एकता नगर, संगमनेर) व सैफअली शेरअली शेख (वय २५ वर्ष रा. नाईकवाडपुरा संगमनेर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघा आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांच्या रोकड रकमेसह पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहनदेखिल ताब्यात घेतले आहे.
आरोपी सोहेल शेख हा समनापुर येथील मलिक स्टील येथे तुफैल मुक्तार मलिक यांच्याकडे मजुरी काम करतो. आरोपी शेख हा गुरुवारी दुपारी त्यांच्याकडून स्टील घेऊन नेवासे फाटा येथे पोहोचविण्यासाठी गेला होता. त्याच्या ताब्यातील गाडी नंबर एम.एच १७ बी वाय ६६१३ मधील स्टील खाली करून त्याचे मिळालेले ३ लाख ६६ हजार ५०० रुपये घेऊन तो सायंकाळी सातच्या सुमारास संगमनेरच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघाला होता. या प्रवासादरम्यान दोन अनोळखी इसम पल्सर मोटारसायकलवरून गाडीच्या मागे येत होते. शेख गाडी घेऊन श्रीरामपूर येथे पोहोचला असता, मोरगे वस्तीपासून आणखीन दोन अनोळखी इसम दुसऱ्या पल्सर मोटर सायकल वरून त्याच्या वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे त्याला जाणवले. मात्र पाठलाग करणाऱ्या दोन्ही पल्सर वरील व्यक्ती त्याच्या गाडी पासून दूरवर असल्याने त्याने फारसे लक्ष दिले नाही.
दरम्यान तो संगमनेरच्या नजीक असलेल्या कोंची-मांचीच्या घाटात आला असता पाठीमागील दोन्ही पल्सर स्वरांनी पुढे त्याच्या वाहनाला मोटारसायकल आडवी घातली. गाडी थांबताच पल्सर वरील व्यक्तींनी शेख याला काहीएक न बोलता मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील काही जणांनी गाडीच्या ड्रावरमध्ये ठेवलेली रोकड काढून घेतली आणि वाहन चालक शेख याला हाता-तोंडाला मारहाण करत लोणीच्या दिशेने चौघेही पसार झाले. अशी आपबिती त्याने पोलिसांना सांगितली होती.
पोलिसांची तपासाची चक्रे फिरली आणि तोच जाळ्यात अडकला
वाहन चालक शेख यांची आपबिती ऐकल्यानंतर संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार उपनिरीक्षक विजय खंडीझोड पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेत उपाधीक्षक मदने आणि निरीक्षक पवार यांनी तातडीने तपासाच्या सूचना देत पथके निर्माण केली. मात्र तांत्रिक तपासामध्ये अशा प्रकारचा गुन्हा घडला नसल्याचे पोलिसांचे मत बनले त्यामुळे त्यांनी फिर्यादीकडे सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत फिर्यादी शेख याने ही रोकड हडप करण्यासाठी चोरीचा हा बनाव रचल्याचे समोर आले. पोलिसांनी फिर्यादीस ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता या गुन्ह्यात त्याला समीर याकुब शेख आणि सैफअली शेरअली शेख यांनी साथ दिल्याचे समोर आले पोलिसांनी या तीनही आरोपींकडून ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम दोन लाख रुपये किमतीचे स्विफ्ट कार असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासात या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील आणि श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी डमाळे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप व मनोज पाटील, पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, श्रीरामपूरच्या सायबर सेलचे पोलीस नाईक फुरखान शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर व गणेश शिंदे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याची उकल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा