अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीतासाठी बाबासाहेब सौदागर यांच्या गीताची निवड
संगमनेर
उदगीर येथे २२,२३ व २४एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या गीत लेखनासाठी श्रीरामपूरचे सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची निवड झाली आहे. या संमेलनाचे कार्यवाह रामचंद्र तिरुखे आणि बसवराज पाटील नागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही निवड केली आहे.
प्रथेप्रमाणे दरवर्षी मराठी भाषा गौरव आणि त्या प्रदेश वैभवाचे गीत ध्वनीमुद्रित करुन त्याची चित्रफित प्रदर्शित केले जाते. यावर्षी मान्यवर निमंत्रित कवी म्हणून आणि संमेलनाचे गीतकार म्हणून कवी बाबासाहेब सौदागर यांना हा सन्मान मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व ते करणार आहेत. मराठवाड्यातील प्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे.
दुनियादारी चित्रपट फेम मराठवाड्यातील प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावर, विश्वास आंबेकर आणि शेफाली कुलकर्णी साकुरीकर यांनी आणि सहकारी यांनी हे गीत गायिले आहे. पुणे येथे कविवर्य गोपाळ अवटी, दिग्दर्शक विजय शिंदे चित्रपट कलाकार काळुराम ढोबळे यांच्या उपस्थितीत हे ध्वनीमुद्रण पार पडले. याप्रसंगी तुळशी रोप देवुन कविवर्य सौदागर यांचा सत्कार करण्यात आला. कवी सौदागर यांनी आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त चित्रपट आणि मालिकांमध्ये गीतलेखन आणि भुमिका केलेल्या आहेत.
पायपोळ हे त्यांचे लोकप्रिय आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहे. पिवळण, सांजगंध, चित्ररंग, भंडारभुल ही त्यांची लोकप्रिय पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. या निवडीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिकचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शिरीष पाटील वडजे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. या गिताचे प्रकाशन, प्रसारण २२एप्रिल रोजी उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती समिती प्रमुख प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा