किरीट सोमय्यांविरोधात संगमनेरात शिवसेना रत्यावर


देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

 संगमनेर : आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात माजी सैनिकाच्या तक्रारीवरुन मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत बसस्थानक चौकात आंदोलन केले. महाआघाडीच्या नेत्यांविरोधात मोहीम उघडणाऱ्या सोमय्यांविरोधातदेखील आता शिवसेनेत संताप व्यक्त होऊ लागला आहे. संगमनेरमध्ये झालेल्या आंदोलनात सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

                सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत या लढाऊ जहाजाला भंगारात जाण्यापासून वाचविण्यासाठी व त्याची डागडुजी करण्यासाठी २०१३ ते २०१४ या काळात आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम उघडली होती. याकाळात त्यांनी अनेक विभागातील लोकांकडून ‘सेव्ह विक्रांत’च्या नांवाखाली कोट्यावधी रुपये गोळा केले. लोकवर्गणीतून गोळा केलेली ही रक्कम जवळपास ५७ ते ५८ कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. हे पैसे त्यांनी राजभवनात जमा करणे अपेक्षित होते, मात्र हे पैसे जमा झाले नसल्याची माहिती विचारलेल्या माहितीत राजभवनाकडून सांगण्यात आली होती. त्यामुळे सोमय्या यांनी या रकमेचे अपहार केला असून त्यांच्याविरोधात केवळ फसवणुकीचा गुन्हा नको तर देशद्रोहाचादेखील दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेने हे आंदोलन केले. आंदोलनात नव्या-जुन्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

               


शहरप्रमुखांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सोमय्या हे केंद्रीय सत्तेचा गैरवापर करत असून त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे काही नेते हे स्वतःला ईडीचे प्रवक्ते समजायला लागले आहेत. दररोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर बेछूट आरोप ते करत आहेत. केंद्र सरकारच्या दबावाखाली ईडीचा गैरवापर करत या माध्यमातुन कारवाया केल्या जात आहेत. हा भाजपाचा एक धंदाच झाला आहे. देशाची संपत्ती असलेल्या विक्रांत युद्ध नौकेच्या नावाखाली वर्गणी गोळा करून ते पैसे स्वतःच लाटून भ्रष्टाचार केलेल्या सोमैय्याला इतरांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवाय अश्या देशद्रोही माणसावर त्वरित गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई देखील व्हावी असे शहरप्रमुख अमर कतारी यांनी म्हटले.



सोमैय्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अश्या भावना शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी व्यक्त केल्या. सोमैय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात जिथे दिसेल तिथे सोमैय्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत, असे नागपुर ग्रामीणचे संपर्कप्रमुख नरेश माळवे यांनी म्हटले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अकोले-संगमनेर समन्वयक आप्पा केसेकर, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, रावसाहेब गुंजाळ, दिपक साळुंके, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, विकास डमाळे, अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, इम्तियाज शेख, दीपक वनम, सुदर्शन ईटप, संजय फड, योगेश बिचकर, पप्पू कानकाटे, प्रथमेश बेल्हेकर, रमेश काळे, वैभव अभंग आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य