धनादेश न वटल्याप्रकरणी श्रीरामपुरच्या व्यापाऱ्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा
संगमनेरच्या अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल
अनंत पांगारकर | संगमनेर
शेतकऱ्याकडून केलेल्या मका खरेदीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकाऱ्यांनी श्रीरामपुरच्या व्यापाऱ्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा व महिनाभराच्या आत तक्रारदाराला ४ लाख ६१ हजार ७०० रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. उदयकुमार रविंद्रकुमार कटारिया (रा. श्रीरामपुर) असे संबधीत व्यापाऱ्याचे नांव आहे.
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील शेतकरी नानासाहेब मनोहर वारुंक्षे यांनी श्रीरामपुर येथील उदय ट्रेडींग कंपनीचे उदयकुमार रविंद्रकुमार कटारिया यांच्याशी २०१७ मध्ये मका विक्रीसंदर्भात व्यवहार केला होता. वारुंक्षे यांच्याकडून कटारीया यांनी मका खरेदी करत मक्याच्या खरेदी व्यवहारापोटी वारुंक्षे यांना ४ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र कटारिया यांच्या बॅक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी दिलेला धनादेश बॅकेतून न वटता परत आला. त्यामुळे वारुंक्षे यांनी कटारिया यांच्याकडे रकमेची वारंवार मागणी केली. मात्र कटारिया यांनी धनादेशाची रक्कम अदा न केल्याने वारुंक्षे यांनी वरील रकमेच्या वसुलीसाठी संगमनेरच्या अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादार यांच्यासमोर झाली. आरोपी आणि फिर्यादीच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायाधीश महादार यांनी फिर्यादीच्या वकीलांचे म्हणणे ग्राह्य धरत आरोपी उदयकुमार रविंद्रकुमार कटारिया यास दोषी ठरवत एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादीस देणे असलेली रक्कम निकालाच्या तारखेपासून १ महिन्याच्या आत भरपाईपोटी देण्याचे आदेश दिले.
वरील रक्कम मुदतीत न भरल्यात आरोपी कटारिया यांना आणखी तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. फिर्यादी वारुंक्षे यांच्यावतीने संगमनेर येथील नामांकित वकील गोरक्ष कापकर यांनी काम बघितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा