लाच भोवली | तहसीलच्या लिपिकास चार वर्षाचा कारावास


 

नायब तहसीलदार मात्र निर्दोष मुक्त

अनंत पांगारकर, संगमनेर


वाळू उचलण्याचा परवाना असतानादेखील ठेकेदाराचे दोन ट्रॅक्टर पकडून कारवाई न करण्यासाठी १६ हजारांची लाच घेणाऱ्या संगमनेरच्या तहसील कार्यालयातील तत्कालीन लिपिकास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गुरुवारी (ता. १९) चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर या लाचखोरीत सामील असल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन नायब तहसीलदाराची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. लाचखोरास शिक्षा होण्याची गेल्या अनेक दिवसातील संगमनेरमधील ही पहिलीच घटना आहे.


सुभाष विठ्ठल भारती (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) असे शिक्षा झालेल्या लिपिकाचे नाव असून ते २०१4 मध्ये संगमनेर तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. तर शितल राजधर सावळे असे निर्दोष मुक्तता झालेल्या आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.


संगमनेर तालुक्यातील कनोली येथील उत्तम वर्पे यांनी २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवरा नदी पात्रातून वाळू उचलण्याचा अधिकृत ठेका मिळविला होता. या परवान्याच्या आधारे ते वाळू वाहतूक करत असताना १३ जून २०१४ रोजी तहसील कार्यालयातील लिपिक सुभाष भारती याने कनोली गावाजवळ ठेकेदार वर्पे यांचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले होते. वाळू वाहतूक पकडल्याची माहिती मिळताच ठेकेदार वर्पे यांनी लिपिक भारती यांची भेट घेतली आणि माहिती देण्याचा प्रयत्न केला असता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत कागदपत्रांसह नायब तहसीलदार शितल सावळे यांना भेटण्याचा सल्ला दिला.


वर्पे यांनी सावळे यांची भेट घेतली असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर वर्पे यांनी अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता तत्कालीन उपाधीक्षक अशोक देवरे यांनी तक्रारीची खातरजमा करण्यासाठी वर्पे यांच्यासोबत एका साक्षीदारास नायब तहसीलदार सावळे यांच्याकडे पाठविले. यावेळी मागणी केलेली रक्कम कमी करून सोळा हजार रुपयांवर निश्चित झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरले.


लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या भाषेच्या रकमेला पावडर लावत त्या नोटा तक्रारदाराकडे सोपविल्या. साक्षीदारांना समक्ष तक्रारदाराकडून सोळा हजाराची रक्कम स्वीकारताना कनिष्ठ लिपिक भारती याला रंगेहात पकडले. त्यानंतर लाख क्लबच्यावतीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भारती आणि नायब तहसीलदार सावळे या दोघांविरोधात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तपासी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर सुरू होती. या खटल्यात सरकार पक्षाने तपासलेल्या चार साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश घुमरे यांनी कनिष्ठ लिपिक भारती याला विविध कलमान्वये दोषी ठरवत चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. या शिवाय चार हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास आणखी चार महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तर तत्कालीन नायब तहसीलदार सावळे यांची मात्र संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली.


नायब तहसीलदारासह लिपिकावर सुरू असलेल्या या लाचखोरीच्या खटल्यांमध्ये संगमनेरकर यांचे लक्ष लागून होते. नायब तहसीलदाराला खटल्यात दिलासा मिळाला असला तरी कनिष्ठ लिपिकास मात्र शिक्षा झाल्याचे संगमनेरातील गेल्या काही दिवसातील हे पहिलेच उदाहरण ठरले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य