महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी ‘यासाठी’ मिळविला मोठा निधी

विकासकामांमधून संगमनेर हे आदर्श शहर व आदर्श तालुका


अनंत पांगारकर | संगमनेर

    आपले घर जसे सुंदर असावे असावे अशी अपेक्षा असते तसे आपले शहरदेखील सुंदर असायला हवे याच दृष्टीकोनातुन आपण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. आज शहराच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. सुसंस्कृत राजकारण ही परंपरा आपण कायम जपली आहे. निवडणूक झाली की कधीही राजकारण केले नाही. विरोधकांचाही सन्मान केला, मात्र विरोधकांनीही चुकीचे वागू नये. विनाकारण मनभेद निर्माण करून चांगले वातावरण बिघडवू नये. जे चांगले आहे त्याला चांगले म्हटलेच पाहिजे असे प्रतीपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

    संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने गंगामाई घाटाचे सुशोभीकरण व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा नामदार थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी रंगारगल्ली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रथितयश उद्योजक राजेश मालपाणी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, उद्योजक कैलास सोमाणी, पालिकेचे प्रशासक तथा प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, मुख्याधिकारी राहुल वाघ, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    मंत्री थोरात म्हणाले, राज्यात कुठेही जा, संगमनेर तालुका सहकार, शिक्षण, आर्थिक समृद्धी, शेती, चांगले वातावरण यामध्ये कुठेही कमी नाही. राज्यातील अग्रमानांकित असलेल्या पहिल्या एक-दोन तालुक्यांमध्ये या तालुक्याचा समावेश होतो. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. येणाऱ्या काळामध्ये विकासातून आणखी मोठे बदल होणार असून समृद्धीत वाढ करण्याचा मोठा पल्ला गाठायचा असल्याचे ते म्हणाले.

    निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपले स्वप्न आहे. मिळालेल्या संधीचा पूर्णपणे उपयोग धरणाच्या कामासाठी व कालव्यांसाठी केला आहे. निळवंडे मुळेच शहराला गोड पाणी मिळत आहे. संगमनेरमध्ये सातत्याने विकास कामे होत असून येथील चांगले राजकारण व चांगले वातावरण राज्याला दिशादर्शक आहे. विकासकामांमुळे संगमनेर हे आदर्श शहर व आदर्श तालुका ओळखला जात आहे.

    1991 पासून नगरपालिकेच्या कामांना खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. तत्कालिन नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी घालून दिलेल्या आदर्शावर नगरपालिकेचे कामकाज सुरू आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी निळवंडे धरणामुळे मिळत आहे. जनतेने केलेल्या प्रेमामुळे व नेतृत्वाचा विश्वासामुळे राज्यात मोठी संधी मिळत गेली आणि या संधीचा पूर्ण उपयोग निळवंडे धरण, कालवे व संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी केला असल्याचे ते म्हणाले.


विरोधकांनी विकासावर चर्चा करावी

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हा विकासाचा ब्रॅण्ड झाला आहे. थोरात यांनी कधीही कोणाबाबत भेदभाव केला नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक दिली. रात्रंदिवस काम करून हा तालुका विकसित केला आहे. गंगामाई घाटाच्या सुशोभीकरणात अनेक नवीन कामे होणार असून स्विमिंग पूल सह आगामी काळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त होणार आहे. संगमनेर हे शिक्षणाचे व विकासाचे केंद्र झाले आहे. विरोधकांनी विकासावर चर्चा करावी मात्र काही लोक धार्मिकतेचा नावावर लोक शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आमदार डॉ. सुधीर तांबे


गैरसमज पसरविणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका

नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरात मोठी गार्डन, 24 तास स्वच्छ मुबलक पाण्याची व्यवस्था, सुंदर रस्ते, वैभवशाली इमारती शी अनेक कामे उभी राहिली आहेत. कोरोना संकटामध्ये अमरधामचे सुशोभीकरणाचे काम तातडीने केले याबाबत काहींनी खोटेनाटे आरोप केले. काम करणाऱ्यावर असे आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे जनहिताचे काम करताना कोणाचा वाईट हेतू नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे. यंग नॅशनल ग्राउंडला धक्का न लावता एसटीपी प्लांट तेथे होणार आहे. त्यामुळे याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये.

दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष

संगमनेरचा विकास अभिमानास्पद

संगमनेरचा विकास हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. विरोधकही खाजगीमध्ये या विकास कामांचा गौरव करतात.

अमर कतारी, शिवसेना शहरप्रमुख

संगमनेर राज्याच्या नकाशावर उठून दिसते.

आर्थिक समृद्धी, सहकार, शिस्त आणि विकास ही चतुःसूत्री संगमनेरात असून संगमनेर हे राज्याच्या नकाशावर उठून दिसते आहे.

राजेश मालपाणी, उद्योजक.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य