धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याला सहा महिन्यांची शिक्षा
अनंत पांगारकर | संगमनेर
प्लायवूड सनमायकाच्या खरेदी व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटण्याची हमी देऊनदेखील तो धनादेश न वटता बँकेतून परत आला, या कारणावरून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस सहा महिन्यांची कैद ठोठावली आहे. याशिवाय नुकसान भरपाई म्हणून 4 लाख 25 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपीने नुकसानभरपाईची रक्कम न दिल्यास आणखी सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विलास लालु कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. आरोपी कुटे यांचे सुकेवाडी समनापुर रस्त्यावर साक्षी फर्निचर नावाचे रिटेल फर्निचर व हार्डवेअर विक्रीचे दुकान होते. कुटे यांनी शहरालगतच्या घुलेवाडी गावातील आनंद प्रफुल्ल बोगावत यांच्या शितल फ्लाय अँड हार्डवेअर या दुकानातून प्लायवूड सनमायका आदी मालाची खरेदी केली होती. या व्यवहाराच्या देण्यापोटी आरोपी विलास कुटे यांनी बोगावत यांना 5 डिसेंबर 2015 रोजीचा 3 लाख 70 हजार रुपयांचा संगमनेरच्या कार्पोरेशन बँकेचा धनादेश दिला होता.
हा धनादेश वटण्याची हमीदेखील त्यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र हा धनादेश बँकेत न वटता बँकेतून परत आल्याने बोगावत यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात कुटे यांच्या विरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कलम 138 अन्वये अँडव्होकेट आनंद गांधी यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती. याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव जाधव यांच्यासमोर झाली.
न्यायाधीश जाधव यांनी आरोपी कुटे यांना दोषी ठरवत सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली. तसेच नुकसान भरपाईपोटी 4 लाख 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची साधी कैद आरोपीला भोगावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात धनादेशा संदर्भात अनेक खटले निकाली निघाले. यामध्ये आरोपींना शिक्षेचे प्रमाण मोठे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे धनादेशाचा अवमान करत मुक्तहस्ते समोरच्या व्यक्तीस धनादेश देत त्याचा अनादर करणाऱ्या आरोपींना न्यायालयात शिक्षा होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी 9373928052 या क्रमांकावर संपर्क करा.
तसेच महत्वाच्या घडामोडी च्या बातम्या वाचण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला 75 88 600 950 हा क्रमांक ॲड करावा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा