संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी सुवर्णा फटांगरे

लोक सहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित व्हाव्यात -

गटविकास अधिकारी अनिल नागने 



अनंत पांगारकर | संगमनेर
विद्यार्थ्यांना कौशल्ये निर्माण करणारे व आनंददायी शिक्षण देण्याबरोरच जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा  निर्माण कराव्या लागतील. प्रशासन, शिक्षक यांच्या समन्वयातून लोकसहभागातून हे कार्य नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांच्या प्रशासकीय कौशल्याने शक्य होईल असा आशावाद गटविकास अधिकारी अनिल नागने यांनी व्यक्त केला.

संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी म्हणून सुवर्णा फटांगरे यांनी सूत्रे स्वीकारली. तालुक्यातील महिला शिक्षिकांच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानवरून नागणे बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील महीला प्राथमिक शिक्षकांच्यावतीने वृषाली कडलग व अंजली मुळे यांनी सुवर्णा फटांगरे यांचा सत्कार केला. व्यासपीठावर अरुण जोर्वेकर, केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी, अशोक गोसावी, दशरथ धादवड, प्रभाकर रोकडे, विद्या भागवत, अलका साखरे  उपस्थित होते.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नागणे पुढे म्हणाले की ,  आनंददायी शिक्षण देण्यात जिल्हा परिषदेच्या शाळा  यशस्वी ठरल्या असल्या तरी हा संदेश अद्यापही समाजापर्यंत पोहचला नाही. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये विकसित करणारे शिक्षण देण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजेत.  केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजानेही आम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घ्यायचा आहे असा आग्रह धरला पाहिजे. सुदैवाने आपण या मार्गावर मार्गक्रमण करत आहोत. परंतु त्यासाठी शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. डिजिटल क्लासरूम , गूगल क्लासरूम सारख्या सुविधा विविध सामाजिक संस्था व लोक सहभागातून मिळवाव्या लागतील. यासाठी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे शिक्षकांकडून कौशल्याने कामे करून घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी वृषाली कडलग, अंजली मुळे, मुक्ता शिंदे, संगिता कडुस्कर, प्रतिभा नागरे यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना फटांगरे म्हणाल्या की, सप्तरंगी परिपथातून मुलांमध्ये संस्कारक्षम जीवन कौशल्ये रुजविली जातात. गुणवत्ता पुर्ण शिक्षणप्रणालीचा वापर करून संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा राज्यात प्रभावी ठरतील असे अभियान राबविण्यासाठी आपण कटीबध्द राहू. विस्तार अधिकारी बाळकृष्ण खोसे, दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख प्रभाकर रोकडे, रावजी केसकर ,  यशवंत आंबेडकर,  अशोक गोसावी, संपत मोरे, नंदू रक्ते, गंगाधर टेंगले, संजय मंडलिक, प्रदीप कुदळ, महेश मोहिते, महेश काळे, मनोज आहेर, योगेश मोरे, संदिप कवडे, संदिप मोरे, सुनील झावरे, विठ्ठल कडूस्कर, वैशाली गुंजाळ, संगिता गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल कडूस्कर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील झावरे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य