या.. मला अटक करा, शिवसेना खासदार संजय राऊत कडाडले


 मुंबई :

हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्वीकारणार नाही. या.. मला अटक करा ! जय महाराष्ट्र! असे ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे.


शिवसेना नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील मोठ्या गटाने वेगळा गट स्थापन करत सरकारचा पाठिंबा काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आणि प्रवीण राऊत प्रकरणी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे. ईडीच्या या नोटीसला राऊत यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.


ट्विटमध्ये राऊत म्हणाले, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळेच बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या.. मला अटक करा! जय महाराष्ट्र! राज्यातील वातावरण राजकीय अस्थिरतेमुळे ढवळून निघालेले असताना शिवसेनेच्या समर्थनार्थ, बंडखोरांविरोधात मोर्चे निघत आहेत, आंदोलने होत आहेत. खासदार राऊत सुद्धा या संदर्भात विविध वक्तव्य करत आहेत. सामना वृत्तपत्र, ट्विटर, सोशल मीडिया पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून बंडखोरांवर तोफ डागत आहे. याच दरम्यान त्यांना आता ईडीकडून समन्स बजावून ईडी कार्यालयात मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे.


राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बंडखोर आमदार आणि विरोधक जेरीस आले असून, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उचलला असल्याचे बोलले जाते. राऊत यांनी हे ट्विट विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले असल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य