महसूलची बेअब्रू, 50 हजाराची लाच घेताना कर्मचारी पकडला
अहमदनगर
राज्यात नवे सरकार सत्तेवर आरुढ झाले असले तरी शासकीय कार्यालयामध्ये काम करण्यासाठी लाच स्वीकारण्याचा सिलसिला थांबण्यास तयार नाही. लाचखोरीचा असाच प्रकार बुधवारी समोर आला आहे. शेवगाव तहसिलदार कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका लिपिकाला पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आल्याने महसूल विभागाची पुरती नाचक्की झाली आहे.
नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. वाळूच्या गाड्या सोडण्या साठी ही लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. महसूल विभागाची आर्थिक साठे लोटे करून सर्रासपणे जिल्ह्यात वाळूचे अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. यातून कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने जिल्ह्यात या वाळू व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुणही उतरले आहेत. याशिवाय या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपले बस्तान बसविले आहे. वाळू तस्करीत उतरलेल्या अनेकांचे यंत्रणेशी अर्थपूर्ण संबंध आहेत.
अशाच एका प्रकरणात महसूलच्या एका लिपिकाने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती त्यामुळे या युवकांनी त्याला पकडून देण्याचा निर्धार करून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार लाचेच्या रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारताना तहसिलदार कार्यालयाच्या आवारात लिपिकाला पकडण्यात आले.
यासंबंधीची कारवाई अद्याप सुरू आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम लिपिक स्वत:साठी घेत होता की यात आणखी कोणी सहभागी आहे, याचा तपास पथक करीत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा