शिर्डीच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी बबनराव घोलप नानांवर
बबनराव घोलप यांच्या रूपाने शिर्डीत पुन्हा एक 'नाना'
अहमदनगरच्या संपर्कप्रमुख पदी सुनील शिंदे
मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर जिल्ह्याकरिता जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी बबनराव घोलप यांची वर्णी लागली आहे तर अपेक्षेप्रमाणे अहमदनगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी शिर्डीचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिण जिल्ह्यातील संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना हटवण्यासाठी अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. मागील विधानसभा निवडणुकीनंतर संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर आणि शहरातील काही नगरसेवक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते मात्र शेवटपर्यंत भाऊ कोरगावकर हे आमच्यामध्ये कोणतेही वाद नसल्याचे सांगत असतानाच त्यांच्या जागेवर आता आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे यापूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती.
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने नगर जिल्ह्यातील शिवसेनेची एकमेव असलेली खासदारकीची जागा देखील शिवसेनेला गमवावी लागली आहे त्यामुळे या मतदारसंघात आता लोखंडे यांच्यापेक्षा सरस उमेदवार शोधण्याचे आव्हान शिवसेने समोर असतानाच माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी टाकून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. घोलप यांच्या नियुक्तीमुळे या मतदारसंघात पुढील हालचालींना वेग येणार असल्याचे मानले जाते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा