नवे आव्हान | निष्क्रिय पोलीस अधिकारी खरोखर गुन्हेगार शोधणार का!
संगमनेर | अनंत पांगारकर
अज्ञात चोरट्यांनी शहराच्या लोकवस्तीतील एटीएम मशीन फोडून तब्बल तीस लाखाची रोकड लंपास केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकाही एटीएम फुटीचा तपास लाऊ न शकणारे संगमनेरातील निष्क्रिय पोलीस अधिकारी या एटीएम फुटीचा खरोखरच तपास लावू शकतील का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शहर पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर या प्रकारामुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
संगमनेर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दिल्ली नाका परिसरात ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन आहे. हे एटीएम मशीन बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आहे. दोघा अज्ञात चोरट्यांनी हे मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत पोलिसांना आरोपीचा माग लागू शकलेला नाही. एटीएम मशीनची तोडफोड करत मशीनमधील 30 लाख 58 हजार 500 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. बुधवारी मध्यरात्री गुन्हा घडला असला तरी तो दाखल करण्यासाठी पोलिसांना गुरुवारी दुपारचे 4:30 वाजले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांबद्दल संगमनेरकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यास राजकीय वरदहस्त असल्याने अनेकदा नागरिकांनी केलेल्या तक्रारी निष्फळ ठरल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देखील पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. पोलीस ठाण्यातील अनेक दाखल गुन्ह्यांचा तपास शहर पोलिसांकडून न होता पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाकडून झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अनेकदा एटीएम फुटीच्या घटना घडल्या आहेत प्रत्येक वेळी लाखो रुपयांचा ऐवज चोरी जाऊन देखील कोणत्याही एटीएम चालविणाऱ्या कंपनीने अथवा बँकेने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली नसल्याने हे सर्व मशीन रामभरोसे आहेत.
एटीएम मशीनचा विमा उतरविला जात असल्याने अनेकदा संबंधित एटीएम कंपन्या अथवा बँका या प्रकाराकडे फारसे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसते. चोरीच्या घटनांमध्ये संबंधितांना पोलिसांकडून फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असते या कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर चोरी गेलेली रक्कम त्यांना विमा कंपन्याकडून मिळत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पोलीस देखील या प्रकरणांचा तपास फारशा गांभीर्याने करताना दिसत नाही. अनेकदा एटीएम फुटीच्या घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाल्यानंतर देखील गुन्हेगारांचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा