संगमनेरात जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणूक
संगमनेर
गेल्या दोन वर्षाच्या कोविड संकटानंतर प्रथमतः संगमनेरमध्ये गणेश विसर्जनाचे मिरवणूक जल्लोषात निघाली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडलेल्या या मिरवणुकीत तब्बल 18 तासानंतर शेवटच्या गणेशाचे विसर्जन झाले. वेळेच्या मर्यादेमुळे पोलिसांनी रात्री बाराच्या ठोक्याला मंडळाची वाद्य बंद केली, त्यामुळे अनेक मंडळांना आपल्या श्रीगणेशाला मूक मिरवणुकीने निरोप द्यावा लागला.
कोविड सारख्या महामारीने जगभराला ग्रासले असताना गत दोन वर्षाच्या कालखंडावर सार्वजनिक उत्साहावर अनेक निर्बंध लादले गेले होते. यावर्षी प्रथमतः सरकारने निर्बंध उठविल्याने मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव राज्यभरात साजरा झाला. संगमनेरातदेखील विविध गणेश मंडळांचा गणेशोत्सवात मोठा उत्साह दिसून आला. दरम्यान गणेशोत्सवातील देखाव्यांच्या कालखंडात पावसाचे देखील सातत्याने आगमन झाल्याने बहुतांशी संगमनेरकरांना गणेशोत्सवातील देखावे पाहता आले नाही. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मात्र पावसाने उघडेप दिल्याने मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली होती.
सकाळी आठ वाजता राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मंडळाच्या गणेशाची विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दुपारी मानाचा श्री गणेश मुख्य मिरवणूक मार्गावर आल्यानंतर त्या पाठोपाठ चौंडेश्वरी मंडळ, साळीवाडा मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ, माळीवाडा मित्र मंडळ स्वामी विवेकानंद मंडळ आदी गणेश मंडळासह शहरातील अनेक गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावर्षी तब्बल 19 गणेश मंडळे विसर्जन मिरवणूक सहभागी झाली होती. शिवसेना शाखा क्रमांक 11 सह विविध मंडळाच्या वतीने मिरवणुकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी नागरिकांना प्रवरापात्रात गणेश विसर्जनासाठी उतरता आले नाही. पालिकेने शहरातील दहा ठिकाणी कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्ती संकलन केंद्र तयार केली होती. एकविरा फाउंडेशनसह लायन्स क्लब, लायन्स क्लब संगमनेर सफायर, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आदींनी गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. प्रशासनाच्या नियोजनामुळे यावर्षी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
अनंत पांगारकर संगमनेर 75 88 600 950


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा