सत्ता बदल झाला तरी निळवंडे कालव्यातून पाणी येणारच


माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

आपल्या काळातील कामांच्या उद्घाटनाचा केवलपणा प्रयत्न

संगमनेर : निळवंडेच्या दोन्ही कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आली असतानाच राज्यात सत्ता बदल झाला असला आणि कोणी काहीही केले तरीदेखील निळवंडे धरणाच्या कालव्यातून येणारे पाणी कोणीही रोखू शकणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली.


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. व्यासपीठावर संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.



थोरात म्हणाले, खूप मोठा संघर्ष करत आपण भंडारदराच्या हक्काचे 30% पाणी मिळविले आहे. ओढ्या-नाल्यांवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. निळवंडे धरण आणि कालवे हे जीवनाचे ध्यासपर्व मानत ते पूर्णत्वास नेले आहे. यासाठी सातत्याने मोठा निधी मिळविला 2019 मध्ये पुन्हा सत्तेवर येतात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कालव्यांच्या कामासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य मिळाले. येत्या काही दिवसात दोन्ही कालव्याद्वारे पाणी आणणे हे आपले उद्दिष्ट होते, आता कालव्यांची देखील कामे अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या कालव्यांमधून येणारे पाणी आता कोणीही रोखू शकणार नाही.



1985 मध्ये संगमनेर तालुक्यातील नेतृत्व संपविण्यासाठी काहींनी बाहेरचा उमेदवार आपल्यावर लादला मात्र जनतेच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढविली आणि ही निवडणूक तालुक्याच्या विकासाला दिशा देणारी ठरली. आपल्या कार्यकाळात सर्वप्रथम तालुक्यासाठी भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी मिळविले. निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत काम केले. या धरणाच्या कामासाठी तत्कालीन सरकारांमधील सर्व मुख्यमंत्र्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री पिचड यांचेदेखील मोठे सहकार्य मिळाले, ज्यांनी मदत केली त्यांची नावे घेतलीच पाहिजे. निळवंडे धरण आपल्या हातून होणे हे नियतीने ठरविले होते. धरणापाठोपाठ आता कालव्याचे कामदेखील आपल्याच काळात पूर्णत्वास जात असताना राज्यात सत्ता बदल झाला. मात्र सरकारमध्ये असताना आपण यासाठी आवश्यक ते सर्व काही केल्याने धरणातून येणारे पाणी आता कोणी रोखू शकणार नाही.


नेतृत्वाचा विश्वास तालुक्यातील जनतेचे प्रेम यामुळे सातत्याने राज्य पातळीवर काम करत असताना जनसामान्यांच्या विकासाला प्राधान्य दिले तालुक्यात कधीही कोणाच्या वाटेत काटे टाकले नाही, विरोधकांचा देखील सन्मान केला, हाताशी असलेल्या सत्तेचा तुरुपयोग केला नाही म्हणून येथील सुसंस्कृत परंपरा आणि राजकारण देशाला दिशादर्शक ठरले आहे. असे असले तरी काहींना येथील विकास बघवत नाही, आपल्यातीलच काही फुटीर त्यांच्यासाठी खबऱ्याचे काम करतात. अशा खबऱ्यांचा जनता बंदोबस्त करेल. मोठमोठ्या विकासाच्या योजना आपल्या माध्यमातून येथे आल्या, आता काहीजण केविलवाणे त्याच्या उद्घाटनाचादेखील प्रयत्न करतील, अशी टीका थोरात यांनी केली.


यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांचे देखील भाषण झाले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी, अहवाल वाचन दत्तात्रय भवर यांनी, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य