कारखाना आणि सभासदांमधील संवाद सेतू आता एका क्लिकवर

माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते स्मार्ट कार्डचे वितरण

फोटो ओळी

थोरात कारखान्याने सभासदांसाठी तयार केलेल्या स्मार्ट कार्डचे वितरण राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

संगमनेर

संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सभासदांसोबत संवाद साधण्यासाठी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून नवी प्रणाली विकसित केली आहे. यामुळे सभासदांसोबतचा संवाद सेतू आता एका क्लिकवर साध्य होणार असल्याचे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.


कारखान्याने सभासदांच्या सोयीसाठी आणि कामकाज सोपे करण्याच्या दृष्टीने सभासदांकरिता स्मार्ट कार्डची निर्मिती केली असून यामुळे कारखान्यासंबंधी माहिती सभासदांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या स्मार्ट कार्डचे वितरण माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना करण्यात आले. हे कार्ड सभासदांना कारखान्याचे सभासदत्व असेपर्यंत वापरता येणार असून एकदा कार्ड घेतल्यानंतर दरवर्षी नवीन कार्ड घेण्याची आवश्यकता सभासदांना भासणार नाही. सभासदांना आपल्या मोबाईलवर स्मार्ट कार्डवरील क्यू आर कोड स्कॅन करून स्वतःकडील ऊस नोंद, ऊस टनेज, ऊस बिलासंबंधी सविस्तर माहिती एका क्लिकवर समजणार आहे. 



तसेच आपल्या नावावर घेतलेली साखर आणि शिल्लक साखर याचा तपशील देखील सभासदांना घरबसल्या या कार्डद्वारे मिळेल. या कार्डमुळे सभासदांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल. याशिवाय थोरात साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थिती नोंदविण्यासाठी हे कार्ड महत्त्वपूर्ण ठरेल. कारखान्याच्या प्रत्येक सभासदास हे स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून यासाठी सभासदांनी आपला पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड कारखान्याच्या गट कार्यालयात जमा करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांनी केले.


माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात या कार्डचे वितरण करतेवेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात, संचालक इंद्रजीत थोरात, चंद्रकांत कडलग, गणपत सांगळे, रामदास वाघ, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, संपत गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य